पुण्यात आता चकणा विक्रेतेही पोलिसांच्या रडारवर

बिअरबारजवळ विक्रेत्याविरूद्ध कारवाईचा बडगा

marathinews24.com

पुणे – कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांनी आता बिअर बारनजीक चकण्याची विक्री करणार्‍यांविरूद्ध मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार अंडाभुर्जी, शेंगदाणे, डाळी, बोम्बील, अंडे, पापड विक्रेत्यांची उचलबांगडी करून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे. संपुर्ण शहरभरात मोहिम हाती घेण्यात आली असून, कारवाई सुरू करण्यात आली आहे. मागील काही दिवसांत विविध बारनजीक चकणा विक्रेत्यांजवळ गंभीर गुन्हे घडल्यामुळे कारवाई हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

कोयत्याने वार करुन तरुणाचा खून – सविस्तर बातमी

बिअर बारनजीक अनेक छोट्या किरकोळ व्यावसायिकांकडून चकण्यांची विक्री केली जाते. त्यामुळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यांच्यामुळे कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याचे दिसून आले. विशेषतः मध्यवर्ती भागात रात्री-अपरात्री उशिरापर्यंत मद्यपींसह गुन्हेगारांची दादागिरी वाढल्यामुळे पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार चकणा विक्रेत्यांची खैर केली जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नुकत्याच एका बीअरबार व्यावसायिकाला पोलिसांनी दणका दिला. पोलीस अधिनियमाखाली संबंधिताचे बीअर विक्री दुकान तीन दिवस बंद केले.

अंडाभुर्जी विक्रेत्यांनाही देणार दणका

शहरासह उपनगरामध्ये दरदिवशी रात्री आठनंतर नियमांचे उल्लंघन करीत अंडाभुर्जीची विक्री केली जाते. त्याठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींचा वावर असल्याचे दिसून आले आहे. त्यासंदर्भात पोलिसांकडे वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने बंडगार्डन, लष्कर, शिवाजीनगर, डेक्कन, स्वारगेट, हडपसर, कोंढवा, वानवडीसह उपगनरातील बेशिस्त अंडाभुर्जी विक्रेत्याविरूद्धही पोलीस अ‍ॅक्शन मोडवर असणार आहेत. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणार्‍या पथारी व्यावसायिकांविरूद्ध महापालिका अतिक्रमणविरोधी पथकांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र, संबंधित पथकांना मरगळ आल्यामुळे पोलिसांनी दंड थोपाटले असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

मद्यविक्रेत्यांनो स्वयंशिस्त पाळा, नियमांचे उल्लंघन टाळा

मद्यविक्री व्यावसायिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असून, नियमांचे उल्लंघन टाळणेही गरजेचे आहे. अन्यथा पोलीस अधिनियमानुसार आम्ही संबंधित मद्यविक्री दुकान काही दिवसांसाठी बंद ठेउ शकतो. अल्पवयीन मुलांना मद्यविक्री न करणे, आजूबाजूला गोंगाट होणार नाही याची दक्षता घेणे, वेळेचे बंधन पाळणे यासह इतर नियमांचे पालन मद्यविक्री दुकानदारांनी करावे. अन्यथा आम्ही संबंधिताविरूद्ध कठोर कारवाई करू, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

मद्यविक्री दुकानाबाहेर अंडाभुर्जीसह इतर पदार्थांची विक्री केली जाते. त्याठिकाणी रात्री-अपरात्री उशिरापर्यंत मद्यपींसह इतर काही आरोपींची ये-जा असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर संपुर्ण पुणे शहरात आम्ही मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×