अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे – शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात तीन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील खडकी, तसेच पुणे- सोलापूर रस्त्यावर हडपसर परिसरात अपघाताच्या घटना घडल्या.
पुण्यात आता चकणा विक्रेतेही पोलिसांच्या रडारवर – सविस्तर बातमी
जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर खडकी रेल्वे स्थानकाच्या समोर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (१६ मार्च) सकाळी अकराच्या सुमारास घडली. अपघातात दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत त्यांचा मुलगा अल्ताफ हनीफ बेलीम (वय ३०, रा. कुमार पिनकॅल सोसायटी, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बेलीम यांचे वडील दुचाकीवरुन सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास जु्न्या मुंबई-पुणे रस्त्यावरुन निघाले होते. त्या वेळी भरघाव वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सरोदे तपास करत आहेत.
पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर गाडीतळ परिसरात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. गौरव राजा सातपुते (वय ३१, रा. रमाईनगरी, नागपूर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांची आई इंदू राजा सातपुते (वय ५९) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरवे सातपुते हा कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाला आहे. २ मार्च रोजी पहाटे तीनच्या सुमारास तो हडपसर येथील गाडीतळ परिसरातून निघाला होता. त्या वेळी दुचाकीस्वार गौरव सातपुते याला भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सातपुते याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक कोलेवाड तपास करत आहेत.
पुणे-सोलापूर रस्त्यावर शेवाळवाडी परिसरात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य बापू देवकर (वय २१, रा. सोलापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्याचा मित्र अतुल सूर्यकांत म्हस्के (वय २०, रा. उत्कर्षनगर, जुळे सोलापूर) याने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अतुल आणि सहप्रवासी आदित्य हे रविवारी (१५ मार्च) पुणे-सोलापूर रस्त्याने निघाले होते. मांजरीतील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रासमोर भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. अपघातात सहप्रवासी आदित्य हा गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार अतुल याला दुखापत झाली. उपचारादरम्यान आदित्य याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ बिनवडे तपास करत आहेत.























