कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांचा अपहरणाचा प्रयत्न
marathinews24.com
पुणे – शहरातील वारजे भागात मद्यधुंद मोटार चालकाने चार ते पाच वाहनांना धडक दिल्याची घटना मंगळवारी घडली. कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाचे मोटार चालकाने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संजोग माने (वय २५) या मोटार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे वाहतूक विभागातील पोलीस शिपाई अमोल पिसाळ यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाहन चोरट्याची शक्कल, चोरीच्या वाहनाला बनावट क्रमांक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर हे न्यायालयीन कामकाजासाठी मंगळवारी दुपारी वारजे परिसरातून निघाले होते. त्यावेळी वारजे एनडीए रस्त्याने प्रवासी वाहतूक करणारी मोटार भरधाव वेगात शिवणेकडे निघाली होती. त्यावेळी भरधाव मोटारीने पाच ते सहा वाहनांना धडक दिली. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पोलीस निरीक्षक क्षीरसागर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कर्मचाऱ्यांनी मोटार चालकाचा पाठलाग सुरू केला. वारजे चौकाजवळ मद्यधुंद मोटार चालकाने टेम्पोला धडक दिली.
पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी प्रसंगावधान राखून मोटार अडवली. त्यावेळी तेथे असणारे वारजे माळवाडी वाहतूक शाखेतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी घटनेची माहिती दिली. मोटार चालक मानेला ताब्यात घेऊन वारजे पोलीस चौकीत नेण्याच्या सूचना दिल्या. वाहतूक पोलीस मोटारीत बसले. तेव्हा चालकाने भरधाव वेगाने मोटार पोलीस चौकीकडे न नेता दुसऱ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. क्षीरसागर यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी मोटार काही अंतरावर अडवली. पोलिसांनी मोटार चालकाला चोप देऊन ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत चालकाने मद्यप्राशन केल्याचे दिसून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.























