पाठीमागून येणाऱ्या ट्रकने स्कूटीला जोरदार दिली धडक
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – भरधाव ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत दीनदयाळ बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुदर्शन टाक (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. टाक हे दुचाकीवरून बँकेत कामावर जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. हा अपघात अंबाजोगाई शहरातील रिंग रोडवरील मानवलोक कार्यालयाजवळ बुधवारी (दि.८) सकाळी घडला.
वाघोली पोलीस ठाण्यातील ३ पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेचे अधिकारी सुदर्शन टाक हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी स्कूटीवरून कामासाठी निघाले होते. तथागत चौकाजवळील रिंग रोडवरून प्रवास करत असताना अनियंत्रित भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, गंभीर मार लागल्याने टाक यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. पोलिसांनी तातडीने घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) रुग्णालयात दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा तपास सुरू आहे.
अपघाताचे वृत्त समजताच दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ॲड. मकरंद पत्की, इतर संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात आणि घटनास्थळी धाव घेत या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. मूळचे उजनी गावचे रहिवासी असलेले सुदर्शन टाक हे बँक परिवारात त्यांच्या अत्यंत मनमिळाऊ आणि शांत स्वभावासाठी परिचित होते. त्यांच्या या अकाली निधनाने दीनदयाळ बँक परिवारासह संपूर्ण शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. आज सायंकाळी त्यांच्या मूळगावी उजनी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





















