सोमवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केली नाराजी
marathinews24.com
पुणे – शहर पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांसह चौघांना लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. पोलीस दलातील लाचखोरीच्या प्रकरणांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. लोहगाव पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने अदखलपात्र गुन्ह्यात मदत करतो, असे सांगून ८० हजारांची लाच घेतली. उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच आर्थिक गुन्हे शाखेतील एका महिला सहायक पोलीस निरीक्षकासह दोघांना २८ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बंडगार्डन रस्ता परिसरात पकडले.
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराने न्यायालयाने बजाविलेले अटक वाॅरंट न बजाविण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेतल्याची घटना नुकतीच घडली. गेल्या महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली.
पुणे पोलीस आयुक्तालयात सोमवारी बैठकीत सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहभागी झाले होते. लाचखोरीच्या घटनांची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसमोर काही प्रश्न उपस्थित करून ‘लाचखोरीच्या प्रकरणांची गांभीर्याने दखल घ्यावी’, अशी सूचना त्यांनी केली. पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बेकायदा धंदे बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अशा घटनांमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे. ‘पोलीस दलाची प्रतिमा स्वच्छ आणि पारदर्शक ठेवण्यासाठी प्रत्येकाने शिस्तीचे पालन करावे’, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
अत्याचार प्रकरणातील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई; न्यायालयात तातडीने आरोपपत्र दाखल करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या सूचना
महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना अत्याचार प्रकरणातील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. ‘महिलांवरील अत्याचार प्रकरणांचा तपास पूर्ण करून तातडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल करा’, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले.
नसरापूर अत्याचार प्रकरणाची घटना ताजी असतानाच पुणे शहरात अत्याचाराच्या तीन घटना घडल्या. महिला, तसेच अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पुणे पोलीस आयुक्तालायत शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तपासाबाबत सूचना दिल्या. ‘बलात्कार, विनयभंगाचे गुन्हे दाखल होत आहेत. महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांचा तपास करुन तातडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल करा. ज्या आरोपींविरुद्ध अशा प्रकारचे दोनहून जास्त गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्यान्वये (झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) कारवाई करून त्यांना कारागृहात स्थानबद्ध करावे.’ असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.























