प्राप्तिकर प्रधान मुख्य आयुक्त विवेक वाडेकर यांची माहिती
marathinews24.com
पुणे – देशात १ एप्रिलपासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू झाला असून, या कायद्यात कर प्रणाली अधिक सुलभ, पारदर्शक केली आहे. हा कायदा अधिकाधिक करदात्यांना समजावा यासाठी पुणे विभागाकडून ‘प्रारंभ २०२६’ ही जागरूकता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे अधिकाधिक करदात्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती प्राप्तिकर पुणे विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त विवेक वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत:सोमनाथची गाथा-ब्रिजेश सिंह – सविस्तर बातमी
वाडेकर म्हणाले, मोहिमेचे उद्घाटन १५ मे रोजी गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस टॉवर येथे होणार आहे. करदाते, कर सल्लागार, उद्योजक अशा सर्व संबंधित घटकांसाठी आहे. कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ उद्योजिका लीला पुनावाला, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चर’चे (एमसीसीआयए) प्रदीप भार्गव उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पुणे हे इंडस्ट्री, उत्पादन, आयटी, शिक्षण, अभियांत्रिकी आदी क्षेत्रांचे हब असून, आर्थिक क्षेत्रांना चालना देणारे शहर असल्याने या मोहिमेला प्रारंभ पुण्यातून केला आहे. प्राप्तिकर पुणे विभागात २३ जिल्हे असून, त्या जिल्ह्यांमध्येही टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविली जाणार आहे.
करसाथी’ हा चॅटबॉट तयार
प्राप्तिकर कायदा समजण्यासाठी ‘करसाथी’ हा चॅटबॉट तयार केला आहे. वारंवार विचारण्यात येणार्या प्रश्नांच्या (एफएक्यू) उत्तरांसाठी ‘करसेतू’ ही सेवा मराठी भाषेतून उपलब्ध करून दिली आहे. प्राप्तिकर सेवा केंद्रातही ही सुविधा दिली जाणार आहे. नव्या कायद्याची मराठी भाषेतील पत्रके, पुस्तके तयार केली आहेत. संबंधित पुस्तक, पत्रकांचे प्रकाशनही कार्यक्रमात केले जाणार आहे. पत्रकांवर ‘क्यूआर’ कोड असणार आहे, असेही वाडेकर यांनी सांगितले आहे.























