डेक्कन पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – परदेशात बासमती तांदूळ, तसेच प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ निर्यात करण्याचे आमिष दाखवून ४ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनीष रमणलाल गांधी (वय ५०, रा. सोजस सार्थक अपार्टमेंट, अभिनव शाळेजवळ, एरंडवणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुंबईतील व्यावसायिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात कौटुंबिक वादातून सुनेकडून सासूचा खून – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुंबईतील चारकोप परिसरात राहायला आहेत. त्यांची आरोपी गांधी याच्याशी ओळख झाली होती. आरोपीने त्यांना बासमती तांदूळ निर्यात व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्याकडून वेळोवेळी परदेशी चलन, तसेच भारतीय चलनात वेळोवेळी २ कोटी ८ लाख रुपये घेतले. पैेसे घेतल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही, तसेच व्यावसायिकाने पैसे परत मागितल्यानंतर टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
आरोपीने अशाच पद्धतीने एका वकिलाची २ कोटी २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तक्रारदार वकील हे सहकारनगर भागात राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीविरुद्ध आणखी एक गुन्हा डेक्कन पोलिसांनी दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थायलंडमधील एका कंपनीला ॲनिमल काॅर्न फूड पाठवायचे आहे. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून आरोपी गांधी याने त्यांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.























