स्वारगेट भागातील मुकुंदननगर परिसरात घडली घटना
marathinews24.com
पुणे – नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात सहाव्या मजल्यावरुन सिमेंटची वीट डोक्यात पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना स्वारगेट भागातील मुकुंदननगर परिसरात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी बांधकाम ठेकेदार, तसेच अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
विनोद बेंदू साहू (वय २७, रा. गणपती चैाक, लोहगाव, मूळ रा. नरी, छत्तीसगड) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत साहू याची पत्नी सविता हिने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम ठेकेदा, तसेच अभियंत्याविरुद्ध (साईट इंजिनिअर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंदनगर भागात एका नियाेजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. ५ मे रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास विनोद साहू हा गृहप्रकल्पाच्या आवारात तळमजल्यावर खडी भरण्याचे काम करत होता. त्या वेळी सहाव्या मजल्यावरुन सिमेंटची मोठी वीट साहू याच्या डोक्यात पडली. गंभीर जखमी झालेल्या साहू याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात संरक्षक जाळी बसविली नव्हती, तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नव्हत्या. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी बांधकाम ठेकेदारासह अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.
वडगाव शेरीत घरफोडी – अडीच लाखांचे दागिने चोरी
भरदिवसा घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वडगाव शेरीतील साईनाथनगर भागात राहायला आहेत. २८ मे रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास तक्रारदार आणि कुटुबीय हे कामानिमित्त बाहेर पडले. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी दोन लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. तक्रारदार सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरी परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक नरवडे तपास करत आहेत.
चार दिवसांपूर्वी कोथरूड भागात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याची घटना घडली होती. शहरात भरदिवसा घरफोडीचे प्रकार वाढले आहेत.























