लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
marathinews24.com
पुणे – नवीन वीज मीटर जोडणीसाठी ठेकेदाराकडून दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणमधील तांत्रिक कर्मचाऱ्याला (वायरमन) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. देहू गावात ही कारवाई करण्यात आली.
खडक पोलीस ठाण्यात पोलीस शिपायाला धक्काबुक्की – सविस्तर बातमी
गजानन बाळासाहेब चट्टे (वय ३५, सध्या रा. मिडास रिजन्सी, देहू बायपास रस्ता, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. त्याच्याविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार आहेत. खेड तालुक्यातील येलवाडी गावात एका महिलेने एक गुंठा जमीन खरेदी केली होती. आरोपी चट्टे हा येलवाडी महावितरण कार्यालयात वायरमन आहे. महिलेने ठेकेदारामार्फत नवीन वीज मीटर बसविण्यासाठी ठेकेदारामार्फत महावितरणकडे ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर चट्टे हा ठेकेदाराला भेटला. या भागात ११ गुंठे जमीन आहे. ‘या परिसरातील ११ जमीन मालकांना नवीन वीज मीटर बसवून देतो’, असे सांगून चट्टे यांना मीटर बसविण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच ठेकेदाराकडे मागितली होती. ठेकेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
देहू गावातील भैरवनाथ चौकात सापळा लावण्यात आला. तक्रारदार ठेकेदाराकडून ११ मीटर बसविण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या चट्टे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले. चट्टे याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि पथकाने ही कारवाई केली. सहायक आयुक्त भारती मोरे तपास करत आहेत. शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.






















