पानमंदवाडीतील ५ मेगावॅट सौर प्रकल्पाचे लोकार्पण; २५०४ शेतकऱ्यांना दिवसा वीज
marathinews24.com
पुणे – Panmandwadi Solar Project : शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी, दिवसा वीज, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतमालासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक आहे. या सर्व बाबींवर शासन सातत्याने काम करत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी चाकण येथे केले.
जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचे – सविस्तर बातमी
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत खेड तालुक्यातील पानमंदवाडी येथे उभारण्यात आलेल्या ५ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण बुधवारी (दि. ४) उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते ऑनलाईन बटण दाबून करण्यात आले. चाकण येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या २० व्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी हा सोहळा झाला. या प्रकल्पामुळे कडूस वीज उपकेंद्रांतर्गत २५०४ शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.
शेतीच्या विकासासाठी केवळ पाणी उपलब्ध असणे पुरेसे नाही, तर दिवसा आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळणेही आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यभरात विकेंद्रित स्वरूपात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पांमधून शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन करणे अधिक सोयीचे होणार आहे. Panmandwadi Solar Project तसेच रात्रीच्या वेळी सिंचनासाठी शेतात जाण्याची गरज कमी होणार असल्याने बिबट्या तसेच अन्य वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
पानमंदवाडी येथील या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी अवाडा कंपनीने केली असून, त्यासाठी सुमारे २० कोटी ७५ लाख रुपये खर्च आला आहे. या प्रकल्पात निर्माण होणारी वीज सुमारे ५.८ किलोमीटर लांबीच्या ११ केव्ही वाहिनीद्वारे ३३ केव्ही कडूस उपकेंद्रापर्यंत आणण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर सौरऊर्जेची निर्मिती करून तिचा उपयोग शेतीपंपांसाठी करण्यात येणार आहे.
कडूस उपकेंद्रांतर्गत एकूण ८ हजार ६४३ वीजग्राहक असून, त्यामध्ये २५०४ कृषी ग्राहकांचा समावेश आहे. वाढत्या विजेच्या मागणीचा विचार करून उपकेंद्रात ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त उच्चदाब रोहित्र बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर उपकेंद्राची एकूण क्षमता १५ एमव्हीए होणार आहे. यावेळी आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीपअण्णा मोहिते पाटील आणि चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनिषा गोरे उपस्थित होत्या. महावितरणतर्फे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम, कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी तसेच अवाडाचे फतेह सिंग आणि मुर्तुजा काझी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.




















