गावांमध्ये उपक्रम राबवून केला संकल्प दिवस साजरा
marathinews24.com
बीड – (अनंत जाधव) – जिल्ह्यातील मस्साजोग येथे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या द्वितीय स्मृतिप्रीत्यर्था दिनी रक्तदान शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन गुरुवारी ( दि.११) केले होते. जनसंतोष फाउडेंशनच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी दिवंगत संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला ग्रामस्थांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहून मित्र परिवाराकडून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. रक्तदान शिबीराला सुरुवात करण्यात आली.
रक्तदान शिबिरात दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख, धनंजय देशमुख , पंचायत समिती सदस्य सहदेव घाटूळ, संदीप देशमुख, पंजाबराजे देशमुख यांच्यासह गावातील १०४ रक्तदात्यानी रक्तदान केले. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचे सांगितले. ज्या नागरिकांनी रक्तदान केले, त्यांना जनसंतोष फाउडेंशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमा देऊन गौरव केला. तसेच दर्गा व कब्रस्तानाचे सुशोभीकरण करण्यात आले. गावातील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले त्यामध्ये १० फुटाची विविध प्रकारचे ५० झाडे लावण्यात आली. त्यात ताम्हण, कदंब, कांचन, अमलतास, बुच, चाफा यांचा समावेश आहे. वृक्षरोपन करताना श्रीकांत सोनवणे, आनंद सोनवणे, अनिल शिंदे, धनंजय देशमुख, दिपक सोनवणे, जनक देशमुख , महावीर सोनवणे यांनी पर्यावरणाचा संदेश दिला.
झाडे लावा, झाडे जगवा’ हा केवळ एक नारा नसून, भावी पिढीच्या अस्तित्वासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काळाची गरज आहे.झाडे आपल्याला प्राणवायू (ऑक्सिजन), फळे, औषधे आणि निवारा देतात म्हणून, केवळ वृक्षारोपण करणे पुरेसे नाही, तर लावलेली झाडे पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांची काळजी घेणेही आपले आद्य कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.या संकल्प दिनासाठी गावतील तरूण, नागरीक आणि पंचक्रोशीतील दिवंगत संतोष देशमुख यांच्यावर प्रेम करणारे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















