पुढील सुनावणी २९ जून रोजी
marathinews24.com
बीड : (अनंत जाधव) – मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात (दि.२३ जून ) रोजी पार पडली. यावेळी आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज फेटाळून चाटेला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे राज्यभर गाजलेल्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २९ जूनला होणार आहे. या खटल्यात महत्त्वाचा घडामोडींचा क्रम सुरूच असून, आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी पार पडत आहे.
विलास घुले हत्या प्रकरण पेटले; ६ आरोपी पकडले – सविस्तर बातमी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या वकिलांनी त्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला.अटक केल्यापासून २४ तासांत चाटे याला कोर्टात हजर करणे अपेक्षित असताना हजर केले नाही. खुनाच्या गुन्ह्यात २२ दिवस उशिरा ताब्यात घेण्यात आले. या आधारे विष्णू चाटेला जामीन देण्याची मागणी करण्यात आली होती. मागील सुनावणीत विशेष सरकारी वकील अँड . उज्जवल निकम यांनी विरोध करताना गेल्या दीड वर्षांपासून विष्णू चाटेने कोणतीही तक्रार केली नव्हती. मात्र, आता अचानक हा मुद्दा उपस्थित करून खटल्याची सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न आरोपींकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सव्वा वर्षांपूर्वी आरोपपत्र दाखल होऊनही या खटल्याची गती मंद आहे. त्यामुळे हा खटला त्वरित चालवला जावा, तसेत विष्णू चाटे याला जामीन देण्यात देऊ नये, अशी विनंतीही निकम यांनी न्यायालयाला केली होती.
त्यानंतर प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणातील सह आरोपी असलेल्या जयराम चाटे याच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद पूर्ण करण्यात आला आहे. इतर अर्जावरचे आदेश सध्या प्रलंबित ठेवले आहेत. येणाऱ्या (२९ जून )रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत जयराम चाटेच्या जामीन अर्जावर न्यायालय आपला आदेश देण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालय आता जयराम चाटेच्या जामीन अर्जावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधले आहे.त्यामुळे होणारी पुढील सुनावणी पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




















