तरुणासह अल्पवयीन साथीदार ताब्यात
marathinews24.com
पुणे – प्रेमप्रकरणातून अल्पवयीनाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील फुरसुंगी भागात घडली. अल्पवयीनाच्या खून प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. तनिष्क अजय राईकवार (वय १७, रा. हेवन पार्क, काळेपडळ, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रोहित संदीप खाडे (वय २०, रा. पानसरेनगर, येवलेवाडी, काेंढवा) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्या घेण्यात आले आहे. याबाबत अजय हरीष राईकवार (वय ४९) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिष्क याचे आरोपीच्या नात्यातील एका युवतीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. आरोपी तनिष्कचे मित्र आहेत. शनिवारी (२५ जुलै) सकाळी सातच्या सुमारास फुरसुंगीतील संकेत विहार परिसरात कचरा डेपोजवळ असलेल्या मोकळ्या जागेत आरोपीने तनिष्कला मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर आरोपी पसार झाले. तनिष्क गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील तनिष्कला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
पसार झालेला आरोपी रोहित आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनाला पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी राेहित याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भूषण पोटवडे तपास करत आहेत.





















