Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

स्वतःचे व्हिजन ठेवा, सद्विवेकाला फॉलो करा! – तुकाराम मुंढे यांचे ‘जेन झी’ला आवाहन

बदल हा प्रगतीचा अविभाज्य भाग – तुकाराम मुंढे

marathinews24.com

पुणे – ‘प्रत्येक तरुणाने स्वतःची स्वप्ने, सद्विवेक आणि अंतरात्म्याला ‘फॉलो’ केले पाहिजे. केवळ प्रवाहासमवेत न वाहता समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत,’ अशा प्रेरक शब्दांत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘जेन झी’ पिढीला ‘बी युवरसेल्फ’चा मंत्र दिला. ‘वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे मला त्रास होत नाही. उलट बदल हा प्रगतीचा अविभाज्य भाग असून, माझ्या जितक्या जास्त बदल्या होतील, तितके अधिक सकारात्मक बदल घडतील,’ अशी रोखठोक भूमिकाही त्यांनी मांडली.

साखर उद्योग ‘मल्टीप्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून विकसित व्हावा – सविस्तर बातमी

‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘भविष्यवेध – संवाद भविष्याचा’ या उपक्रमांतर्गत ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत आहेर यांनी मुंढे यांची मुलाखत घेतली. तुकाराम मुंढे यांचे वरिष्ठ बंधू अशोक मुंढे, विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष सुनील गाडवे, वी फाऊंडेशनच्या शामला देसाई, आम्रपाली चव्हाण, दिनेश कदम आदी उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी आपल्या बालपणापासूनचा खडतर प्रवास, यूपीएससीतील अपयश आणि यश, प्रशासकीय कारकीर्दीतील कठोर निर्णय आणि अन्न सुरक्षेशी संबंधित धोरणांवर मनमोकळे भाष्य केले.

‘बीए झाल्यानंतर एमए राज्यशास्त्र प्रवेशासाठी मी पहिल्यांदाच ‘लालपरी’ एसटीने पुण्यात आलो होतो. शिवाजीनगर बसस्थानकावरून पुणे विद्यापीठात पायी गेलो. प्रवेश मिळत होता, परंतु वसतिगृह उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्या सायंकाळी मला निराश होऊन परत जावे लागले. नंतर यूपीएससीच्या तयारीदरम्यान जयकर ग्रंथालय आणि रानडे इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालयात अभ्यास केला. मित्राच्या खोलीवर ‘पॅरासाईट’ म्हणून राहताना ढेकणांमुळे रात्र-रात्र झोप यायची नाही. त्या काळात चायनीज गाड्यांवर मी आयुष्यात पहिल्यांदा चायनीज खाल्ले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘एमए’ करताना परिस्थितीमुळे ऑम्लेट-पाव आणि फरसाण-केळी हेच ‘स्टेपल डाएट’ होते. आता मी ते ‘स्ट्रीटफूड’ खाल्ले तर माझा घसा बसेल,’ अशी आठवण सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

यूपीएससीच्या खडतर प्रवासाबाबत सांगताना ते म्हणाले, ‘फक्त यशाकडे पाहू नका, त्यामागील संघर्षाकडेही पाहा. मला दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अपयश आले. तरीही खचून न जाता ‘पीएचडी’ सुरू केली, नेट परीक्षा उत्तीर्ण झालो, कॉलेजमध्ये तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून काम केले, ‘एमपीएससी’ परीक्षेत उत्तीर्ण झालो. त्यानंतरही ‘यूपीएससी’ची तयारी सुरूच ठेवली. ११ मे २००५ रोजी मी यशदामध्ये विपश्यना करत असताना फोन आला की, ‘तुमचे देशात २० व्या रँकने सिलेक्शन झाले आहे.’ तो क्षण ऐकून माझा श्वास काही मिनिटांसाठी थांबला होता. या यशामागे मोठा संघर्ष होता.’

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांबाबत बोलताना त्यांनी खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून न घेण्याची सडेतोड भूमिका मांडली. ‘भेसळयुक्त अन्न, विषारी ताडी-दारू आणि निकृष्ट अन्नपदार्थ नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. ‘एफडीए’ने तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक सुरू केला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हायकोर्टाच्या कँटीनपासून ते शासकीय कार्यालयांपर्यंत सर्वत्र नियमानुसारच तपासणी सुरू आहे. अन्न उद्योगाने नियमांचे पालन करणे, एफडीएने नियमन करणे आणि ग्राहकांनी सजग राहणे यातूनच ही व्यवस्था बदलेल.’

तरुणाईला मार्गदर्शन करताना मुंढे म्हणाले, ‘कोणाचे अंधानुकरण करू नका, तर प्रत्येकाकडून चांगले गुण शिका आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. डिजिटल युगात तरुण पिढीचा ‘अटेंशन स्पॅन’ अवघ्या आठ सेकंदाचा झाला आहे आणि स्क्रीन टाइम ८-९ तासांवर गेला आहे. त्यामुळे केवळ सोशल मीडियावर रील्स स्क्रोल करू नका, तर विचार करा. कष्टाची तयारी ठेवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. प्रवाहातील लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे वाहून न जाता जिवंत माणसाप्रमाणे ध्येयाकडे वाटचाल करा. परिस्थिती कशीही असली, तरी तुमचे भविष्य हे तुम्ही आज घेतलेल्या निर्णयांवरच अवलंबून असते.’

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अरविंद जगताप यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय प्रवासावर आणि व्यतिमत्त्वावर लिहिलेल्या विशेष पत्राचे भावनिक वाचन केले. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अशोक मुंढे आणि अमित रुके यांनी मनोगत व्यक्त केले. विरेश आंधळकर यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.

बीयर आणू का?’ या प्रश्नाने दिल्ली सोडली

‘यूपीएससी’च्या तयारीदरम्यान १९९६ मध्ये पहिल्यांदा दिल्लीला गेल्याचा किस्साही त्यांनी सांगितला. ‘दिल्लीतील जवाहर बुक डेपोमधून पुस्तके घेतल्यानंतर पहाडगंजमधील एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्या वेळी वेटरने ‘बीयर आणू का?’ असे विचारताच मला संताप आला. मी तातडीने बॅग पॅक केली आणि रेल्वे स्थानक गाठले. तिकीट नसतानाही कर्नाटक एक्स्प्रेसचे जनरल तिकीट काढून टॉयलेटजवळ बसत भुसावळपर्यंत प्रवास केला आणि तेथून बसने संभाजीनगर गाठले,’ असे त्यांनी सांगताच सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

शाळेतच पहिला ‘बदली’चा अर्ज

तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या प्रतिमेशी जोडलेला एक रंजक किस्साही यावेळी समोर आला. ‘ताडसुर्णा गावातील शाळेत आठवीत असताना भूगोलाचा एकही धडा शिकविला जात नसल्याची तक्रार आम्ही शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. ‘आम्हाला या शिक्षकाची बदली पाहिजे,’ असा ‘आदेश’ असे लिहिलेला अर्ज आपण केला होता आणि त्यानंतर त्या शिक्षकाची बदलीही झाली,’ अशी आठवण त्यांनी सांगितली.

कोणत्याही व्यक्तीपेक्षा व्यवस्था महत्त्वाची आहे. व्यवस्थेने नियमांनुसार काम केले पाहिजे. अधिकारी येतील-जातील; मात्र व्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी उत्तरदायित्व आणि कार्यपद्धतीची संस्कृती विकसित झाली पाहिजे. त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसमवेत नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे आहे.
– तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×