तब्बल ३० अटी व शर्ती घालून परवानगी
marathinews24.com
पुणे – काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी तब्बल ३० अटी व शर्ती घालून परवानगी दिली आहे. त्यामुळे चर्चा सुरू झाली असून, या अटींमध्ये ड्रोनद्वारे शुटींग करण्यासाठी देखील मनाई केली आहे. त्यासोबतच महिला आणि पुरूषांसाठी वेगवेगळी बैठक व्यवस्था करण्यात यावी, असेही नमूद केले आहे. हा कार्यक्रम येत्या २२ ऑगस्टला पुण्यातील एसएसपीएमएस कॉलेज मैदान, आरटीओ चौक येथे पार पडणार आहे.
कोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळा – सविस्तर बातमी
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे शिक्षण, रोजगार, सुरक्षितता, समान संधी आणि विद्यार्थिनींच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, पुणे शहरात आगामी सण, विविध आंदोलने आणि मोर्चांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यामुळे गांधींच्या कार्यक्रमाला परवानगी मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर पोलिसांनी कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखवला आहे; मात्र त्यासोबत तब्बल ३० अटींची मोठी यादी काँग्रेस आयोजकांच्या हाती दिली आहे. पोलिसांच्या अटीनुसार कार्यक्रमस्थळी क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांना प्रवेश देता येणार नाही. स्टेज व मंडप अधिकृत व्यावसायिकांकडूनच तयार करून घेणे, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करणे, स्टेजची मजबुती आणि सुरक्षिततेचे प्रमाणपत्र घेणे, कार्यक्रमाशी संबंधित सर्व विभागांची परवानगी व ना-हरकत प्रमाणपत्रे घेणे आयोजकांसाठी बंधनकारक केले आहे.
कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांसाठी किमान चार प्रवेशद्वार ठेवणे, खासगी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करणे आणि महिला सुरक्षेसाठी महिला स्वयंसेवकांचा वापर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्याबरोबर कार्यक्रमस्थळी योग्य प्रकाशयोजना, अग्निरोधक साहित्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे आदेश आहेत. विशेष म्हणजे कार्यक्रमातील ध्वनिव्यवस्थेवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांसह ध्वनिप्रदूषण अधिनियम २००० आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. कार्यक्रमस्थळी हाय-लाईट्सचे फोकस आकाशात सोडता येणार नाहीत. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्याची जबाबदारीही आयोजकांवर सोपवली आहे.
कार्यक्रमाच्या संपूर्ण परिसरात दिवसरात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यरत यंत्रणा ठेवावी, ज्येष्ठ नागरिक किंवा सामान्य रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच आक्षेपार्ह प्रतिमा, बॅनर किंवा अनधिकृत प्रकार घडणार नाहीत याची जबाबदारी आयोजकांची राहणार आहे. कार्यक्रमस्थळी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा बेकायदेशीर कृत्य होईल, अशा कोणत्याही प्रकाराला परवानगी दिली जाणार नाही. महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला प्रवेशद्वारावर महिला कर्मचाऱ्यांकडून तपासणीची व्यवस्था करावी, पुरुष स्वयंसेवकांचा वापर महिलांच्या तपासणीसाठी करू नये, अशाही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत पोलिस, वैद्यकीय पथक आणि अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी पोहोचता यावे, यासाठी स्वतंत्र मार्ग मोकळा ठेवण्याचे आदेश आहेत. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणेही बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच विमानतळ प्राधिकरण आणि सीआयएसएफने घालून दिलेल्या सुरक्षा अटींचे काटेकोर पालन करण्यास सांगण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
ज्वलनशील पदार्थांचा वापर करण्यासही बंदी आहे. स्टेजसमोरील संपूर्ण परिसराचे बॅरिकेडिंग करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आयोजक समितीचे सदस्य आणि व्हीआयपी व्यक्तींनाही प्रवेशाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाची परवानगी घेतल्यानंतरच वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. कार्यक्रमामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा रस्त्यावर अडथळा निर्माण झाल्यास परवानगी रद्द करण्याचा अधिकार पोलिसांनी राखून ठेवला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या दौऱ्यात सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘छात्रों की गुंज’च्या माध्यमातून राहुल गांधी पुण्यातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार असल्याने काँग्रेसने या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील तसेच पुण्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामाला लागले आहेत. मात्र, पोलिसांनी घातलेल्या ३० अटींच्या कडक चौकटीत हा कार्यक्रम काँग्रेस कशा पद्धतीने पार पाडते, याकडे आता पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






















