दिल्लीऐवजी पुण्यात उतरल्याची माहिती
marathinews24.com
पुणे – दुबईहून आलेला तरुण पुणे आंतरराष्ट्रीय विमातळावरून बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले. अफजल असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ फैजल याने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अफजल हा मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौरचा रहिवासी आहे. तो अबुधाबीत नोकरी करत होता. ३० जुलै रोजी तो दुबईहून विमानाने दिल्ली विमानतळावर उतरणार होता. मात्र, तो दिल्ली विमानतळावर उतरला नाही. चौकशीत तो पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली. अफजलच्या कुटुंबीयांनी त्याचे मित्र आणि नातेवाइकांकडे चाैकशी केली. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर त्याच्या भावाने नुकतीच विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
नैराश्यातून बीडच्या खो-खो पटूची पुण्यात आत्महत्या – सविस्तर बातमी
नवले पूल परिसरात टँकरची वाहनांना धडक
भरधाव टँकरने चार वाहनांना धडक दिल्याची घटना मुंबई-बेंगळुरु बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात घडली. अपघातात रिक्षाचालक जखमी झाला. कात्रज चौकाकडून नवले पुलाकडे बुधवारी दुपारी पाण्याच्या टँकर निघाला होता. भरधाव टँकर चालकाचे नियंत्रण सुटले. टँकरने तीन मोटारी, तसेच रिक्षाला धडक दिली. अपघातात वाहनांचे नुकसान झाले. रिक्षाचालक जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल गौड, उपनिरीक्षक किरण लिटे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर नवले पूल परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. नागरिकांनी जखमी रिक्षाचालकाला त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहने हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.






















