पुण्यातील वडगाव बुद्रूकमधील घटना, ठेकेदाराविरूद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर प्लास्टरचे काम सुरू असताना तोल जाउन पडल्यामुळे दोन मजूरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ८ ऑगस्टला संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक मधील त्रिदल समृद्धी साईटवर घडली होती. याप्रकरणी कामगारांच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ठेकेदाराविरूद्ध सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संजयकुमार छन्नू खुटेल (वय ३६ रा. छत्तीसगड) आणि नारायण परदेशी वर्मा (वय ३४, रा. छत्तीसगड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ६७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रूकमध्ये त्रिदल समृद्धी साईटवर इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ८ ऑगस्टला संध्याकाळी चारच्या सुमारास चौथ्या मजल्यावर संजयकुमार खुटेल आणि नारायण वर्मा हे बांधकाम मजूर प्लास्टरचे काम करीत होते. त्यावेळी तोल जाऊन पडल्याने दोघेही गंभीररित्या जखमी होउन बेशुद्ध पडले. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, कामगारांच्या जीवासह सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे त्यांचा जीव गेला आहे. असा ठपका ठेउन सिंहगड पोलिसांनी ठेकेदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी तपास करीत आहेत.






















