सोशल मीडिया प्रोफाइल, बनावट इमिग्रेशन अधिकाऱ्याचा फोन
marathinews24.com
पुणे – सोशल मीडियावर खोटी प्रोफाईल तयार करून मैत्री केल्यानंतर फ्रान्सहून भारतात येत असताना दिल्ली विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याची बतावणी करून सायबर चोरांनी एका तरुणीची तब्बल २१ लाख ८९ हजार ५० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरांविरोधात चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ८ ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडला.
पिंपरीतील सराइताकडून पिस्तूल जप्त – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने, शहजाद अहमद शेख या नावाने सोशल मीडियावर खोटी प्रोफाईल तयार करून फिर्यादीशी संपर्क साधला. आरोपीने आपण फ्रान्समधील पॅरिस येथे असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर भारतात येत असताना आपल्याकडे रोख स्वरूपात मोठी रक्कम असल्याने दिल्ली विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादीशी व्हॉट्सअपवरून संपर्क साधण्यात आला. समोरच्या व्यक्तीने आपण इमिग्रेशन विभागातील अधिकारी असून ‘फ्रान्स लेमन’ असल्याचे खोटे नाव सांगितले. संबंधित व्यक्तीला सोडवण्यासाठी व्हिसा डॉक्युमेंट क्लिअरन्स, तिकीट बुकिंग, बँक ऑफिसर तसेच करन्सी कन्व्हर्जनसह विविध कारणे पुढे करण्यात आली.
कारणांसाठी फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तसेच यूपीआय आयडीवर वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून २१ लाख ८९ हजार उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी तरुणीने पोलिसांकडे जात तक्रार दिली घेतली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, संबंधित बँक खाती, मोबाईल क्रमांक, व्हॉट्सॲप खाते आणि सोशल मीडिया प्रोफाईलची माहिती तपासली जात आहे.
खोटी सोशल मीडिया ओळख, परदेशातून भेटवस्तू किंवा पैसे पाठवण्याचे आमिष आणि त्यानंतर कस्टम, इमिग्रेशन अथवा कुरिअर अधिकाऱ्यांच्या नावाने पैशांची मागणी करणाऱ्या सायबर चोरांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
परदेशात नोकरीचे आमिष पडले ५ लाखांना..
बारामती येथील ३९ वर्षीय तरुणाला तिघांनी परदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत ५ लाख ३५ हजार ९०१ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी प्रतिभा भाटी, जहर (पूर्ण नाव माहित नाही) आणि अमित कुमार (रा. विमाननगर) तिघांवर विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२५ ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ही
घटना घडली. तरुणाला परदेशात नोकरी आणि विजा मिळवून देण्याच्या आमिषाने या तिघांनी त्याच्याकडून ५ लाख ३५ हजार उकळले.
मात्र, त्यानंतर नोकरी अथवा विजा न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात येताच त्यांना पोलिसांकडे जात तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश बोलके करत आहेत.


























