सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – वैध सावकारी परवाना नसताना संगनमत करून व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करत तब्बल १ कोटी १३ लाख ५० हजार रुपये वसूल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फिर्यादीच्या भावाविरोधात ६२ लाख रुपयांचा चेक बाऊन्सचा खटला दाखल केल्याचा आरोपही केला आहे. याप्रकरणी ॲड. गुरमितसिंग गुरनामसिंग होरा (वय ५५, रा. चव्हाणनगर) तरवींदरसिंग गुरनामसिंग होरा (वय ५८, रा. पिसोळी) गुरदीपसिंग जगतसिंग माखिजा (वय ६३, रा. एक्सेल कॉर्नर, घोरपडे पेठ, गुरुवार पेठ) यांच्याविरोधात सहकारनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कोणताही सावकारी परवाना नसताना फिर्यादीस व्याजाने पैसे दिल्याचे सांगत सन २०१२ ते २०२१ या कालावधीत १ कोटी १३ लाख ५० हजार रुपये वसूल केल्याचा आरोप आहे. याशिवाय फिर्यादीच्या भावाविरोधात ६२ लाख रुपयांचा चेक बाऊन्सचा खटला दाखल करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच या प्रकरणातील साक्षीदार गणपत मगर यांच्याकडूनही सन २०१५ ते २०१९ या कालावधीत ४२ लाख रुपये व्याजापोटी वसूल केले. त्यानंतर त्यांच्याविरोधात ४७ लाख ५२ हजार रुपयांच्या चेक बाऊन्सचा खटला दाखल केल्याचा आरोप आहे.
या सर्व व्यवहारांसाठी खोटा समजुतीचा कबुलीजबाब तयार करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे व संगनमतासह महाराष्ट्र सावकारी अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप खंडागळे करत आहेत.


























