महिलेची २२ लाखांची फसवणूक
marathinews24.com
पुणे – विवाहविषयक संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून एकाने महिलेची २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बेकायदा सावकारी प्रकरणी वकिलासह तिघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला जनवाडी भागात राहायला आहे. महिलेने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. त्यानंतर आरोपीने महिलेशी संपर्क साधला. फ्रान्समधील एका कंपनीत कामाला असल्याची बतावणी त्याने केली. त्याने विवाहविषयक संकेतस्थळावर बनावट नावाने प्रोफाईल तयार केली होती. फ्रान्समधून महिलेला भेटण्यासाठी येणार असल्याची बतावणी त्याने केली.
त्यानंतर दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर सीमाशुल्क विभागाने (कस्टम) आठ हजार युरो परदेशी चलन जप्त केले आहे. कस्टमची कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी बतावणी त्याने केली. त्यानंतर आरोपीने महिलेकडे वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून २१ लाख ८९ हजार रुपये घेतले. महिलेने एका बँक खात्यात ही रक्कम जमा केली. महिलेने आरोपीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.


























