वडिलोपार्जित ३६ एकरावर ताबेमारीच्या प्रयत्नाचा आरोप
marathinews24.com
पुणे – मी भाजप कार्यकर्ता असून, बुथप्रमुख, तालुकाअध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पदे भूषवली आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या नातलगांची कोथरुडमधील प्रॉपर्टी लॅडमाफियाला गिळंकृत करण्यासाठी सक्षम पोलीस अधिकारी दुसर्या बाजूकडील लोकांना मदत करीत आहेत. त्यामुळे या राज्यात दाद कोणाला मागणी करायची, प्रशासन पोलीस यंत्रणा यांच्या खिशात बसवली आहे. अशी जर मदत करत असाल तर आम्ही दाद कोणाला मागायची, असा सवाल भाजप कार्यकर्त्या सारिका लोणारी यांनी व्हिडिओद्वरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
कोथरूड परिसरातील किष्किंधानगरात असलेल्या वडिलोपार्जित ३६ एकर जमिनीवरून वाद सुरू झाला आहे. याप्रकरणी भाजप महिला कार्यकर्त्याा सारिका लोणारी यांनी थेट कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेउन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांना धारेवर धरले. लॅड माफियांना मदत करण्यासाठी कोथरुड पोलिसांनी जमिनीच्या मोजणीवेळी मोठा फौजफाटा पाठवल्याचा आरोप लोणारी यांनी केला. तसेच मी भाजपची बुथप्रमुख, तालुका अध्यक्षासह विविध पदावर काम केलेले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात अन्याय का, असा सवाल त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून विचारला आहे.
लोणारी यांनी केलेल्या आरोपानुसार, किष्किंधानगरातील जमिनीवर ताबा मिळवण्यासाठीचा प्रयत्न समीर मुलाणी यांनी केला आहे. ही जागा वडिलोपार्जित मालमत्ता असून मालकी हक्कासंबंधीची कागदपत्रे यापूर्वीच कोथरूड पोलीस ठाण्यात सादर केली होती. मात्र, जमिनीची अनधिकृत मोजणी सुरू असताना कोथरूड पोलिसांनी संबंधिताला पोलीस बंदोबस्त पुरवला. या मोजणीला विरोध करणार्या मेहुण्याला पोलिसांनी ताब्यात घेउन दीड तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. आरोपीला पोलीस संरक्षण कोणत्या आधारावर दिले, असा सवाल लोणारी यांनी उपस्थित केला.
‘आम्ही भाजपचे कार्यकर्ते असूनही आमच्यासोबत असा प्रकार घडला. पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा संशय आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी कागदपत्रांची तपासणी करून प्रकरणाची योग्य ती दखल घेतली जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे लोणारी यांनी सांगितले. याप्रकरणात मुलाणी यांचा बाजू अद्याप समोर आली नाही.





















