घरबसल्या ऑनलाइन कामातून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक
marathinews24.com
पुणे – ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी असे आमिष दाखवनू सायबर चोरट्यांनी एका महिलेची ६ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत महिलेने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखविणारा संदेश पाठविला होता. महिलेने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. सुरुवातीला महिलेला एक काम देण्यात आले. या कामाचे पैसे बँक खात्यात जमा केल्याचे चोरट्यांनी भासविले. या व्यवसायात पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले. चोरट्यांच्या खात्यात महिलेने पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलसांकडे तक्रार दिली.
शासकीय नोकरीच्या आमिषाने एकाची ५ लाखांची फसवणूक
पुणे-शासकीय नोकरीच्या आमिषाने एकाची पाच लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी देवानंद साठे, राजेंद्र शिरसाठ (दोघे रा. बारामती, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड रस्ता परिसरात राहायला आहेत. आरोपींशी त्यांची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दोघा आरोपींनी त्यांना दाखविले होते. आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी पाच लाख १७ हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर तक्रादाराने आरोपींकडे नोकरीबाबत विचारणा केली. तेव्हा आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक महाले तपास करत आहेत.





















