दोघे ठार, १२ जखमी, ट्रकचालक, मालक ताब्यात
marathinews24.com
पुणे – भरधाव ट्रक चालकाने नियंत्रण सुटून त्याने पाठीमागून टेम्पोला धडक दिली. त्यामुळे दोन्ही वाहने लेन सोडून दोन मोटारींना जाउन धडकल्यामुळे विचित्र अपघात घडला. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून, तब्बल १२ जण जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास जांभुळवाडी, दरी पुलाजवळ घडली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी ट्रक चालकासह मालकाला ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हास, वैतरणा खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध – सविस्तर बातमी
हृदयनाथ मोहन गायकवाड (वय ४७ रा. मेघवाडी पोलीस ठाण्याच्या बाजूला जोगेश्वरी पूर्व मुंबई) आनंदीबाई रामचंद्र वाडकर (वय ५० रा. सेक्टर १० नेरूळ नवी मुंबई) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघातात जखमी झालेल्या १२ जणांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर भारती हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, सिल्वर बर्च हॉस्पिटल, श्रेयस हॉस्पिटल याठिकाणी उपचार सुरू आहेत. वाहन चालक प्रमोद विठ्ठल वाघ (वय ४० रा तालुका खटाव जिल्हा सातारा) आणि ट्रकमालक संदीप गोरख सूर्यवंशी (वय ४५ रा. तालुका खटाव जिल्हा सातारा) यांना आंबेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगलोर हायवेवर साताराकडून पुण्याच्या दिशेने ट्रकचालक (क्रमांक एमएच ०९ सीयु ७८२८) १३ सप्टेंबरला रात्री सव्वा बाराच्या सुमारास जात होता. त्यावेळी जांभुळवाडी, दरी पुलाजवळील लक्ष्मी लॉज समोर ट्रकचालकाने टेम्पो (ट्रक क्रमांक एमएच ११ सीएच ९००७) या वाहनाला पाठीमागून ठोकर दिली. त्यामुळे ट्रक व आयशर टेम्पो लेनसोडून मुंबईकडून सातार्याकडे जाणार्या लेनवर पडले. त्याचवेळी परिसरातून जाणार्या मोटार (क्रमांक एमएम ०३ इआर ८४३२) या वाहनासह (एम.एच ४३ सीएम ३७५९) या वाहनांवर जाऊन दोन्ही वाहने आदळली.
अपघातात आयशर ट्रक, मारुती सुझुकी एर्टिगा व टाटा अल्ट्रोज ही तिन्ही वाहने पूर्णपणे नादुरुस्त झाली असून, त्यांचा चक्काचूर झाला. त्यातील चालकासह प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. जखमीपैकी हृदयनाथ गायकवाड आणि आनंदी वाडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ट्रकचालक प्रमोद वाघ, मालक संदीप सूर्यवंशी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांसह आंबेगाव पोलीस, वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य राबवून जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे परिसरातील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर वाहतूक पुर्ववत झाली.





















