अपघातात पाच वर्षांच्या मुलासह तिघे जखमी
marathinews24.com
पुणे – Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आरटीओ चौकात गुरुवारी पहाटे घडली. अपघातात दुचाकीवरील पाच वर्षांच्या मुलासह तिघे जण जखमी झाले. गुलाब रामजी गावित (वय ३४, रा. चापापाडा, जि. नाशिक) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी सुभाष रामजी गावित (वय ३२), अनिता सुभाष गावित (वय २८), यश सुभाष गावित (वय ५) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सुभाष गावित याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अटक करण्याच्या धमकीने जेष्ठाला लुटले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार गुलाब, त्याचा भाऊ सुभाष, पत्नी अनिता, मुलगा यश हे गुरुवारी (१७ सप्टेंबर) पहाटे चारच्या सुमारास प्रादेशिक परिवहन कार्यालय चौकातून (आरटीओ) निघाले होते. त्या वेळी भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. Accident News अपघातात दुचाकीस्वार गुलाब, सहप्रवासी सुभाष, त्याची पत्नी अनिता, मुलगा यश हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वी दुचाकीस्वार गुलाबचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक गणेश वानखडे तपास करत आहेत.
नारायण पेठेत सोसायटीतील वाहनांना आग
नारायण पेठ पोलीस चौकी परिसरात असलेल्या एका सोसायटीतील दुचाकी आणि मोटारीला आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. नारायण पेठ चौकी परिसरात रुद्र सोसायटी आहे. सोसायटीच्या आवारातील एक इलेक्ट्रीक दुचाकी आणि मोटारीला आग लागल्याची घटना सकाळी सहाच्या सुमारास घडली. सोसायटीच्या तळमजल्यावर मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने रहिवाशांमध्ये घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या कसबा पेठ केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.






















