१३ जणांना लुटले
marathinews24.com
पुणे – Pune Ganesh Visarjan Theft : गणपती विसर्जन मिरवणुकीतील तुफान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पुण्याच्या मध्यवर्ती भागात धुमाकूळ घातला. मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळ्यासह मंगळसूत्रांवर डल्ला मारला. १९ आणि २५ सप्टेंबरला आणखी १३ चोरीच्या घटना दाखल झाल्या आहेत. यात तब्बल ८ लाख ८ हजार ३६० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी विश्रामबाग आणि फरासखाना पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
भाजप कार्यकर्त्याची दादागिरी; तरुणाला मारहाण केल्याने गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
गणेश विसर्जन मिरवणुकीतील चोरीचे ५० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि बुधवार पेठेतील गर्दी चोरट्यांनी हेरली. महिला, तरुण तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील दागिने हेरून गर्दीतून हात साफ करण्यात आला. सेवासदन चौकात सुमीत जामदार (रा. खराडी) यांची १ लाख १८ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबवली. तर कुंटे चौकात वैशाली दशरथ (रा. पौड रोड), मयूर हसबे आणि ऋषिकेश तवले यांचे मिळून ८८ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व सोनसाखळ्या चोरीला गेल्या.
बुधवार चौकात ज्येष्ठ नागरिक जाळ्यात
फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील बुधवार चौकात दुपारी चारच्या सुमारास बन्सिधर गोपाळ किंकर (रा. कर्वेनगर) यांचा ८४ हजार रुपये किमतीचा सोन्याचा दागिना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन लांबवला. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अलका, टिळक चौकातही सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.
Pune Ganesh Visarjan Theft अलका चौकात वैष्णवी गोरे (रा. वारजे) यांची २० हजार रुपयांची सोनसाखळी, तर सदाशिव पेठेतील टिळक चौकात स्वाती अवचरे (रा. कोंढवा) यांची ७३ हजार ४४० रुपये किमतीची सोनसाखळी व मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले. तर केळकर रस्ता ते रमणबागपर्यंत चोरट्यांचा वावर असल्याचे दिसून आले आहे. रमणबाग चौकात विशाल काळोखे (रा. कोथरूड) यांची ४५ हजार रुपयांची सोनसाखळी, तर केळकर रस्त्यावरील मंदार लॉजसमोर महेश जाधव (रा. पिंपरी) यांची ३५ हजार रुपयांची सोनसाखळी चोरीला गेली.
विजय टॉकीज, मुळचंद कॉर्नर, जोगेश्वरी लेनमध्येही डल्ला लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीजजवळ रामभाऊ सुपेकर (रा. राजेंद्रनगर) यांची ६५ हजार रुपयांची सोनसाखळी, मुळचंद कॉर्नर येथे ७७ वर्षीय रुगाराम चौधरी (रा. मॉडेल कॉलनी) यांची ५५ हजार रुपयांची सोनसाखळी, तर बुधवार पेठेतील जोगेश्वरी लेनमध्ये आदित्य अडागळे (रा. घोरपडी) या तरुणाची २५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी लांबवली.























