लंडनला कुरिअरने मेफेड्रॉन पाठविण्याचा आरोप; अटकेची कारणे न दिल्याचा बचावाचा दावा
marathinews24.com
पुणे – पोलिसांनी उघडकीस आणलेल्या ३ हजार ६०० कोटी रुपयांच्या मेफेड्रॉन तस्करी प्रकरणातील संदीप यादव आणि देवेंद्र यादव (दोघेही, दिल्ली) यांना मुंबई उच्च न्यायालयाने पाच ऑक्टोबरला जामीन मंजूर केला. लंडनला कुरिअरच्या माध्यमातून मेफेड्रॉन पाठविण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप दोघांवर होता. या प्रकरणात एकूण १ हजार ८३७.८४ किलो मेफेड्रॉन जप्त केले होते. आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे विशेष सत्र न्यायालयाने दिलेली मुदतवाढ बेकायदेशीर असल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला.
पुण्यात पोलिसांना ६ वर्ष गुंगारा देणारा गजाआड – सविस्तर बातमी
गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सोमवार पेठेत वैभव माने याला ५०० ग्रॅम मेफेड्रॉनसह पकडले होते. त्याने विश्रांतवाडीतील हैदर शेख याच्याकडून ड्रग्ज आणल्याचे सांगितले होते. पथकाने हैदरकडून आणखी १ हजार २५० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान कुरकुंभ एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीतून ६६३ किलो, दिल्लीतून ३१९ किलो, अन्य ठिकाणांहून ६३१ किलो आणि सांगलीतील गोदामातून १४८ किलो मेफेड्रॉन जप्त केले. तपासाची व्याप्ती वाढल्यानंतर प्रकरणाचा तपास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे सोपविण्यात आला. तपासात एका आरोपीने दिलेल्या जबाबानुसार, हे ड्रग्ज संदीप यादवच्या कुरिअर कंपनीत नेण्यात येत होते. देवेंद्र यादव त्या कंपनीत व्यवस्थापक असल्याचेही तपासात समोर आल्याचा दावा केला. लंडनस्थित विरेंदरच्या सांगण्यावरून ड्रग्ज लंडनला पाठविण्याची तयारी करण्यात येत असल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला.
पुणे सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. बचाव पक्षातर्फे ऍड. अतुल आर. पाटील यांनी केवळ सहआरोपींच्या जबाबाच्या आधारे अटक करण्यात आल्याचा मुद्दा मांडला. तसेच अटकेची कारणे लेखी स्वरूपात देण्यात आली नाहीत आणि एनडीपीएस कायद्यातील कलम ४२ मधील प्रक्रियेचे पालन करण्यात आले नसल्याचा युक्तिवाद केला.






















