विमाननगरात दुचाकीस्वाराकडून रोकड आणि लॅपटॉपची लूट
marathinews24.com
पुणे – शहरात वेगवेगळ्या घटनेत दोघांना लुटण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक आणि विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. विमाननगर भागात दुचाकीस्वाराला धमकावून त्याच्याकडील रोकड आणि लॅपटाॅप असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघड – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण खडकी बाजार परिसरात राहायला आहे. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास दुचाकीस्वार तरुण विमाननगर भागातून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या एकाने तरुणाला अडवून वाद घालण्यास सुरुवात केली. विरुद्ध दिशेने का आला ? अशी विचारणा केली. त्यानंतर दुचाकीस्वार आरोपीने साथीदारांना बोलावून घेतले. तरुणाला धमकावून त्याच्याकडील ९ हजार ८०० रुपये आणि लॅपटाॅप असा ४५ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. दुचाकीवरुन आरोपी पसार झाले. घाबरलेल्या तरुणाने नुकतीच विमानतळ पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत.
शहरातील मध्य भागात एकाला धमकावून त्याच्या खिशातील १ हजार २०० रुपये काढून घेण्यात आले. या प्रकरणी राहुल उर्फ नळ्या राजेंद्र लांडगे (वय ३३, रा. इनामके मळा, लोहियानगर) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण गुरुवार पेठेतील मीठगंज पोलीस चौकीजवळ राहायला आहे. १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तरुणाला धमकावून आरोपीने त्याच्या खिशातील रोकड लुटली. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे तपास करत आहेत.





















