लोखंडी हत्याराचा धाक दाखवून रोकड लुटली
marathinews24.com
पुणे – शहरात जबरी चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या. लक्ष्मी रस्त्यावर लोखंडी हत्याराचा धाक दाखवून एका व्यक्तीच्या खिशातील रोकड जबरदस्तीने काढून घेण्यात आली. तर विमाननगर परिसरात रिक्षा विरुद्ध दिशेने आल्याबाबत जाब विचारल्याचा राग आल्याने रिक्षाचालकाने साथीदारांच्या मदतीने एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील रोकड आणि लॅपटॉप चोरून नेला. या दोन्ही प्रकरणांत खडक आणि विमानतळ पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्या – सविस्तर बातमी
लक्ष्मी रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाजवळ मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात १४ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व्यक्ती आपल्या मोपेडवरून घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. लोखंडी हत्याराचा धाक दाखवून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या खिशातील एक हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या आहेत.
विमाननगर येथील हयात हॉटेलजवळ दुसरी घटना घडली. तक्रारदार व्यक्ती सार्वजनिक रस्त्यावरून जात असताना एक रिक्षा विरुद्ध दिशेने आली. याबाबत रिक्षाचालकाला जाब विचारला असता, त्याला राग आला. त्याने आपल्या तीन साथीदारांना बोलावून घेतले आणि संबंधित व्यक्तीला हाताने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील नऊ हजार ८०० रुपये आणि लॅपटॉप जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





















