पुण्यात पोलीस शिपायाचे निलंबन
marathinews24.com
पुणे – Police Constable Suspension : सोशल मीडियावरील बातमीवर इन्स्टाग्रामद्वारे आक्षेपार्ह, प्रक्षोभक आणि बेजबाबदार टिप्पणी करणे पोलीस शिपायाला भोवले आहे. पोलीस मुख्यालयातील बी कंपनीत कार्यरत असलेले शिपाई समाधान अभिमान गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू असून, चौकशीच्या अधीन राहून त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिले आहेत.
तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्या – सविस्तर बातमी
समाधान गायकवाड हे पुणे शहर पोलीस मुख्यालयात बी कंपनीत कार्यरत होते. सोशल मीडिया इन्स्टाग्रामवरील एका दैनिकाच्या वेबपेजवर ‘नेत्याला संपवलं; लाठीकाठी अन् दगडांनी केला हल्ला’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. संबंधित बातमीवर गायकवाड यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम आयडीवरून अत्यंत आक्षेपार्ह, प्रक्षोभक आणि बेजबाबदार स्वरूपाची टिप्पणी केली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या शिस्तप्रिय पोलीस दलातील कर्मचार्यानेच टिप्पणी केली. हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी तसेच कायद्याचे उल्लंघन करणार्या कृत्यांना समर्थन देणारी टिप्पणी नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
पोलीस दलाची प्रतिमा सर्वसामान्य जनतेमध्ये मलिन झाल्याचेही आदेशात नमूद केले आहे. Police Constable Suspension मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ मधील नियम ३(१-अ)(एक)(ब) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. निलंबनाच्या काळात गायकवाड यांना कोणत्याही प्रकारची रजा मंजूर होणार नाही. पोलीस मुख्यालय सोडून जाण्यासाठी मुख्यालयाचे उपायुक्त यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. निलंबन काळात त्यांनी नियमितपणे मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक यांच्याकडे हजेरी लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.























