गंभीर गुन्ह्यांची नोंद; पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार
marathinews24.com
पुणे – शहरातील सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणाऱ्या सराइताला परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डाॅ. सागर कवडे यांनी शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले. प्रथमेश उर्फ जयेश पंकज देसाई (वय २१, रा. जाधव बिल्डिंग, नऱ्हे ) असे तडीपार केलेल्या गुंडाचे नाव आहे. देसाई याच्याविरुद्ध गंभीर दुखापत करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
दिवाळीत व्यापारी पेठेत दिवसा मालवाहू वाहनांना बंदी – सविस्तर बातमी
त्याच्या दहशतीमुळे नागरिक पोलिसांकडे तक्रार करत नव्हते. देसाई याला पुणे, पिंपरी चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात यावे, असा प्रस्ताव सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भूपेश साळुंके, पंकज देशमुख, अरविंद धावडे, अश्विनी त्रिभुवन यांनी तयार केला.
संबंधित प्रस्ताव सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्फतीने उपायुक्त डाॅ. सागर कवडे यांच्याकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर उपायुक्त डाॅ. कवडे यांनी देसाई याला शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले.























