उपसभापती सचिन अहिर यांच्या उपस्थितीत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले संवर्धन व स्वच्छता अभियानाचे लोकार्पण; राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
marathinews24.com
पुणे – भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या उपस्थितीत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले संवर्धन व स्वच्छता अभियाना’चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.
शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा – सविस्तर बातमी
महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचे साक्षीदार असलेले गडकिल्ले ही राज्याची अनमोल ऐतिहासिक संपत्ती आहे. Shivneri Fort Conservation Campaign या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच गडकिल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि ऐतिहासिक स्थळांबाबत नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या अभियानाच्या माध्यमातून गडकिल्ल्यांवरील स्वच्छता, परिसराचे पर्यावरणीय संतुलन आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी उपसभापती अहिर म्हणाले, गडकिल्ले हे केवळ पर्यटनाची ठिकाणे नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे, पराक्रमाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. पर्यटकांनी किल्ल्यांवर स्वच्छता राखावी, प्लास्टिक व कचरा टाकू नये तसेच ऐतिहासिक वास्तूंना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी.
इतिहासाचा अभिमान बाळगतानाच तो पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. संविधानातील कर्तव्यभावना आणि ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाची जाणीव यांची सांगड घालत शिवनेरीवर सुरू झालेला हा उपक्रम स्वच्छ, सुंदर आणि संरक्षित गडकिल्ल्यांच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
किल्ले राजगड व लोहगडावर संविधानाचा जागर; पोवाड्यातून सामाजिक समता, बंधुता आणि लोकशाहीचा संदेश
हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक किल्ले राजगडावर तसेच लोहगडावर संविधान दिनानिमित्त पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचा वारसा लाभलेल्या या ऐतिहासिक भूमीत पोवाड्याच्या दमदार सादरीकरणातून भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानिक मूल्ये आणि नागरिकांच्या मूलभूत हक्क व कर्तव्यांचा प्रभावी जागर करण्यात आला.
राजगडाच्या आणि लोहगडाच्या ऐतिहासिक वातावरणात घुमलेल्या पोवाड्याच्या बुलंद आवाजाने उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक एकात्मता आणि संविधानाप्रती आदराची भावना जागृत केली. इतिहासातील स्वराज्याचा प्रेरणादायी वारसा आणि आधुनिक भारताच्या संविधानिक मूल्यांची सांगड घालत हा पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेच्या मोहिमेसाठी हे जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरेल. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच इतिहासप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.























