Breking News
Science on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा26/11 Mumbai Attack Martyrs Tribute Pune : पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदना

Jyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेष

Jyotirao Phule Women's Rights

जोतिराव फुले यांचा स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा !

marathinews24.com

पुणे – Jyotirao Phule Women’s Rights : पाश्चात्त्य देशात १९ व्या शतकात स्त्रीवाद अर्थात स्त्री स्वातंत्र्याची चळवळ बाल्यावस्थेत असताना भारतात स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीचे बीजारोपण जोतिराव फुले करीत होते. भारतात राजा राम मोहन रॉय यासारख्या थोर समाजसुधारकांनी सतिप्रथा आणि इतर अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध आवाज उठविला होता. जोतिराव फुले यांनी स्त्री शिक्षण, केशवपन बंदी, बालविवाह विरोध इत्यादी प्रकारचे कार्य केले. त्याचबरोबर त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा विचार प्रभावीपणे मांडला.

जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न – सविस्तर बातमी 

फुले यांनी आपल्या एकूण आंदोलनात स्त्रियांच्या समानतेच्या लढ्याला शूद्र, अति शूद्रांच्या लढ्याच्या बरोबरीचे स्थान दिले होते. त्यांनी वैयक्तिकरीत्या केलेल्या प्रयत्नांमध्ये सुद्धा स्त्री स्वातंत्र्याच्या कार्याला अग्रक्रम होता. फुले यांनी ओळखले होते की, जोपर्यंत हिंदू धर्माचे स्त्री शूद्र आणि अतिशूद्र यांच्याविरोधी असलेले तत्त्वज्ञान नाकारले जात नाही, तोपर्यंत स्त्री, शूद्र आणि अतिशूद्र यांच्या स्वातंत्र्याचा विचार या देशात रुजू शकणार नाही. त्यांचे ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तक म्हणजेच स्त्री-पुरुष अर्थात मानवांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा होय.

स्त्री-पुरुष समतेचा विचार

मानवी समाजाच्या विकासासाठी स्त्रियांना पूर्ण समता असणे आवश्यक आहे, असा विचार जॉन स्टुअर्ट मिल यांनी मांडला. स्त्री पुरुष हे समान आहेत, त्यांच्यात कोणताच फरक नाही. या विचाराचा युरोपात सर्वत्र प्रचार आणि प्रसार करण्यात आला होता. याच विचारामुळे संपूर्ण पाश्चात्त्य देशांमध्ये स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीला गती मिळाली होती.

जोतिराव फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले की, ‘आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांस उत्पन्न केले. त्यापैकी स्त्री पुरुष हे उभयता जन्मतःच स्वतंत्र व एकंदर सर्व अधिकारांचा उपभोग घेण्यात पात्र केले आहेत.’ स्त्री पुरुष यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद करणे चुकीचे आहे. कारण स्त्री पुरुष हे समान आहेत. पुरुषांप्रमाणे स्त्रीला देखील निर्माणकर्त्यांने उत्पन्न केले. त्यामुळे ही स्त्री कनिष्ठ आहे, असे मानणे योग्य नाही. स्त्री गुलाम होऊ शकत नाही; असा अतिशय मूलगामी विचार त्यांनी मांडला.

फुले यांचा स्त्री स्वातंत्र्याचा विचार हा दयेवर आधारित नाही. ‘स्त्री पुरुष समान आणि स्वतंत्र आहेत.’ या मानवी स्वातंत्र्याच्या मूलभूत सिद्धांतावर त्यांचा स्त्री-स्वातंत्र्याचा विचार आधारित असल्याचे स्पष्ट होते. त्यांनी ‘मानवी स्त्रीपुरुष’ असा स्त्री-पुरुषांचा उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे ते स्त्रीला ‘माणूस’, ‘मानव’ या शब्दांनी संबोधतात. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तकात ‘एकंदर सर्व मानव स्त्री पुरुष’ किंवा ‘स्त्री अथवा पुरुष’ अशा समान अर्थाने त्यांनी स्त्री-पुरुषांचा उल्लेख केला आहे. म्हणून सुप्रसिद्ध संशोधिका गेल ऑम व्हेट यांनी ‘कल्चरल रिव्होल्ट इन कॉलनीअल सोसायटी’ या आपल्या ग्रंथात नमूद केले की, ‘फुले यांचा स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन त्यांच्या भाषेतून व्यक्त झालेला आढळून येतो. त्यांनी सर्व एकंदर स्त्री-पुरुष असा उल्लेख केला असून ही केवळ मराठीतच नाही तर इंग्रजीच्या दृष्टीनेही एक नवीन प्रथा आहे.’ गेल ऑमव्हेट सारख्या पाश्चात्त्य संशोधिकेने स्त्रीबाबत फुले यांनी समतादर्शक आणि सन्मानदर्शक जे शब्द वापरले, त्याची दखल घेतली आहे. Jyotirao Phule Women’s Rights

स्त्री-पुरुष समान आणि स्वतंत्र आहेत असा केवळ विचार मांडूनच फुले थांबत नाही तर मानवाचा परिपूर्ण विकास होण्याकरिता ज्या गोष्टींची आवश्यकता असते; त्या सर्व गोष्टी स्त्रियांना मिळायला पाहिजेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. पुरुषांप्रमाणेच स्त्रीलादेखील मानवी अधिकार आहेत. म्हणून कुणी कुणावर जबरदस्ती करू शकत नाही. त्याबाबत फुले यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, “आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री-पुरुषास एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहेत. त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरदस्ती करू शकत नाही त्याप्रमाणे करणाऱ्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.”

“स्त्री-पुरुष सर्व मानवी अधिकारांचा उपभोग घेण्यास एकसारखे पात्र असतात. स्त्रियांस एक तर्‍हेचा नियम लागू करणे व लोभी आणि धाडसी पुरुषांस दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.” असे फुले यांचे स्पष्ट मत होते. स्त्री पुरुष हे समान असून दोघांनाही समान मानवी अधिकार आहेत. अशावेळी पुरुष व स्त्री या दोघांकरिता वेगवेगळे नियम लागू करणे हे मानवी स्वातंत्र्याविरुद्ध आहे. स्त्रीचे मानवी अधिकार नाकारणाऱ्या धर्मग्रंथांना त्यांनी प्रखर विरोध केला होता. ते म्हणतात की, ‘काही धाडसी पुरुषांनी आपल्या जातीच्या स्वार्थासाठी बनावट मतलबी धर्मपुस्तकात स्त्रियांविषयी असे आपमतलबी लेख करून ठेवले आहेत.’ ज्या धर्मग्रंथांनी स्त्रीला शूद्र लेखून तिच्यावर अनेक अमानुष निर्बंध लादलेत, त्या सर्व ग्रंथाचा त्यांनी विरोध केला. हे सर्व ग्रंथ काही लोकांनी स्वार्थासाठी लिहिले. या सर्व धर्मग्रंथांनी स्त्रीचे मानवी हक्क नाकारले आहेत, असे त्यांनी वारंवार सांगितले.

स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा

स्त्री ही स्वतंत्र आहे तिला सर्व प्रकारचे मानवी अधिकार मिळाले पाहिजेत, म्हणून फुले त्यांनी स्त्री-पुरुषांच्या मानवी हक्कांचा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तकात प्रामुख्याने उल्लेख केला आहे. हे हक्क पुढीलप्रमाणे आहेत – Jyotirao Phule Women’s Rights

१) निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांस उत्पन्न केले. स्त्री-पुरुष हे उभयता जन्मतःच स्वतंत्र व एकंदर सर्व अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र आहेत.

२) सर्व स्त्री-पुरुष एकंदर सर्व मानवी अधिकारांचे धनी आहेत. एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरदस्ती करू शकत नाही.

३) सर्व स्त्रियांस अथवा पुरुषांस एकंदर सर्व मानवी हक्कांविषयी आपले विचार आणि मते बोलून दाखविण्यास, लिहिण्यास आणि प्रसिद्ध करण्यास स्वातंत्र्य आहे.

४) सर्व मानव स्त्री-पुरुषास धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे.

५) दुसऱ्यांच्या धर्मासंबंधी मतांवरून किंवा राजकीय संबंधाच्या मतांवरून स्त्री पुरुषास कनिष्ठ मानून छळ करू नये.

६) सर्व मानव स्त्री पुरुषास धर्म, गावकी अथवा मुलकी संबंधी अधिकाराच्या जागा त्यांच्या योग्यतेनुरूप आणि सामर्थ्यानुरूप मिळाव्यात म्हणून निर्माणकर्त्याने त्यांस समर्थ केले आहे.

७) सर्व मानव स्त्री पुरुषास धर्म, गावकी व मुलकी या संबंधीची प्रत्येक मानवाची स्वतंत्रता, मालमत्ता, संरक्षण आणि त्यांचा जुलमापासून बचाव करण्याचा अधिकार आहे.

८) स्त्री-पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारची आवड निवड या आधारावर फरक न करता त्यांचे खाणे- पिणे आणि लेणे नेसणे याविषयी कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध नसावा.

अशाप्रकारे जोतिराव फुले यांनी स्त्री-पुरुषांच्या मानवी हक्कासंबंधीचे नियम सांगितले आहेत. हे नियम म्हणजेच स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा होय, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

आजही स्त्री गुलाम आहे, याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रियां अज्ञानी आहेत. त्यामुळे त्या आपल्या मानवी हक्कांविषयी जागृत झाल्या नाहीत, असे फुले यांचे स्पष्ट मत होते. म्हणून ते म्हणतात की, ‘सर्व स्त्रियांना त्यांचे मानवी हक्क समजू देऊ नये, या इराद्याने लोभी पुरुषांनी त्यांस विद्या शिकविण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे एकंदर सर्व स्त्रियांवर असे अनेक जुलमी प्रसंग येऊन गुदरले. लोभी, धाडसी व पुरुषांनी मोठी कावेबाजी करून कोणत्याही कामांमध्ये स्त्री जातीची संमती घेतल्याशिवाय एकंदर सर्व पुरुषांनी आपले घोडे पुढे दामटले.’ त्यांनी स्त्रियांच्या गुलामगिरीचे खरे कारण ओळखले होते. ते कारण म्हणजे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारणे, हे होय. म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला होता.

फुले हे केवळ आपल्या देशातील स्त्रियांचा विचार करीत नाहीत, तर सर्व गाव, प्रांत, देश आणि खंडातील स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा विचार मांडतात. तसेच ते विश्वातील सर्व स्त्री-पुरुषांनी कोणताच भेद न करता एकजुटीने एकमेकांशी सत्य वर्तन करावे आणि आपले एक कुटुंब समजून राहावे, असा उपदेश करतात. ‘स्त्री अथवा पुरुष जे सर्व गावच्या, प्रांताच्या, देशाच्या, खंडाच्या संबंधाने अथवा कोणत्याही धर्मातील मताच्या संबंधाने स्त्री आणि पुरुष या उभयंतांनी अथवा सर्व स्त्रियांनी अथवा सर्व पुरुषांनी एकमेकात एकमेकांशी कोणत्याही प्रकारची आवड निवड न करता यासर्व स्त्री-पुरुषांनी या भूगोलावर आपले एक कुटुंब समजून एकमताने, एकजुटीने, एकमेकांशी सत्य वर्तन करावे.’

अशाप्रकारे सर्व स्त्री पुरुषांनी वर्तन केले असते तर पोलीस, तुरुंग, न्यायाधीश या गोष्टींची जगात आवश्यकता राहिली नसती, सर्वत्र आनंदी आनंद राहिला असता, असे प्रतिपादन जोतिराव फुले करतात.

डॉ. सरोज आगलावे, नागपूर (लोकराज्य एप्रिल २०२६ अंकातून साभार)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×