विज्ञानाच्या प्रसारासाठी मातृभाषेतून साहित्यनिर्मिती व्हायला हवी – डॉ. शेखर मांडे यांचे प्रतिपादन; शि. प्र. मंडळी, मसाप व विज्ञानभारती आयोजित विज्ञान नांदी संमेलनाचा समारोप
marathinews24.com
पुणे – Science on Wheels Initiative India : “विज्ञान क्षेत्रात भारताने गेल्या काही काळात मोठी प्रगती केली आहे. विविध माध्यमातून आपण विज्ञान समाजासमोर आणण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहोत. विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी विज्ञानभारतीच्या माध्यमातून ‘सायन्स ऑन व्हील्स’सारखा उपक्रम राबविण्यात येणार आहे,” असे प्रतिपादन वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळाचे (सीएसआयआर) माजी महासंचालक व विज्ञानभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर मांडे यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळी, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र आयोजित विज्ञान नांदी संमेलनाच्या समारोपावेळी डॉ. शेखर मांडे बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळीच्या परिसरातील ज्ञानमंडपम् येथील भाऊसाहेब चितळे सभागृहात आयोजित कार्यक्रमावेळी शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष सुधीर काळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री प्रवीण रामदास पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक प्रा. जी. एन. कुलकर्णी, सृष्टीज्ञान मासिकाचे संपादक डॉ. जयंत जोशी आदी उपस्थित होते.
डॉ. शेखर मांडे म्हणाले, “काही वर्षांपूर्वी आपण ‘स्पेस ऑन व्हील्स’ हा प्रकल्प राबविला होता. त्याचप्रमाणे लवकरच ‘सायन्स ऑन व्हील्स’ हा प्रकल्प घेऊन येत आहोत. जगभरात सध्या तापमान वाढीचा धोका वाढला असून येत्या काळात ही खूप मोठी समस्या असेल. अशाप्रकारच्या समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित येऊन प्रयत्न करावे लागणार आहेत. मराठी साहित्य संमेलन असो किंवा सृष्टीज्ञान मासिक या दोन्ही गोष्टींना १०० वर्ष होणे ही निश्चितच मोठी गोष्ट आहे. एखाद्या ध्येयाने सतत १०० वर्ष काम करत राहणे, आपले विचार लोकांसमोर आणणे ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे.”
योगेश सोमण म्हणाले, “अभिजात दर्जा लाभलेल्या मराठीसाठी १०० वर्ष सातत्याने काम करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य आहे. १०० वर्ष लेखक, साहित्यिक, समीक्षक, भाषाप्रेमी, वाचक, ग्रंथालयाचे लोक, प्रकाशक अशा सगळ्यांना एकत्र आणणारे व्यासपीठ तयार होणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. १०० व्या वर्षानिमित्त संमेलनातील चार दिवसांत १०० उपक्रम राबवण्यात येणार आहेत, ९९ नांदी संमेलने हाही त्याचाच एक भाग आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या १०० व्या संमेलनात एक पूर्ण दिवस विज्ञान संमेलन होणार आहे.”
सुधीर काळकर म्हणाले, “या एकदिवसीय विज्ञान नांदी संमेलनामुळे मराठीला आतापेक्षा वैभवशाली दिवस येणार हा विश्वास दृढ झाला आहे. मातृभाषेतून विज्ञान पुढे आले तर भविष्यात भारताच्या प्रगतीला कोणीही अडवू शकणार नाही. येत्या काळात विज्ञान व शिक्षण विषयातील संस्था मिळून असेच चांगले काही करु शकलो तर ती निश्चितच परिवर्तनाच नांदी ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ मध्ये भारत विश्वगुरू होईल, असे म्हटले असून या गतीने विकास झाला तर तेवढाही वेळ लागणार नाही.”
त्याआधी झालेल्या विज्ञान साहित्यिक परिसंवादात विज्ञान लेखक प्रा. डॉ. संजय ढोले, डॉ. रंजन गर्गे, हेमंत लागवणकर व सुरेंद्र पाटसकर यांनी विचार मांडले. विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाविषयी आवड निर्माण करणारे सत्र झाले. त्यामध्ये विठ्ठल रायगावकर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. योगेश वाडदेकर यांची निवेदिका वसुंधरा काशीकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. प्रा. जी. एन. कुलकर्णी, डॉ. जयंत जोशी व प्रवीण रामदास यांनीही मनोगते मांडली. दिवसभर चाललेल्या या संमेलनाला विज्ञानप्रेमी पुणेकर, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. डॉ. मानसी माळगावकर यांनी सूत्रसंचालन केले. कौस्तुभ साखरे यांनी आभार मानले.






















