वाघोली पोलिसांच्या कारवाई दणक्यामुळे खळबळ
marathinews24.com
पुणे– ट्रक चालकाकडे अवजड वाहन परवाना नसतानाही त्याला गाडी ताब्यात दिल्यानंतर संबंधिताने बेदरकारपणे गाडी चालविली. दुचाकीस्वाराला धडक देउन ट्रक चालक त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी संबंधित ट्रक चालकासह त्याच्या मालकाविरूद्धही गुन्हा दाखल करीत दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. बेदरकारपणे वाहन चालविणे, वाहन परवाना नसणे, निष्काळजीपणा बाळगणेय यासह मोटार वाहन कायद्यानुसार दोघांवर कारवाई केली आहे. हा अपघात १८ मे रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास केसनंद गाव चौकात घडला आहे.
पीएमपीएलसह एसटी प्रवासात महिलांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
ट्रक चालक जर्नादन बाबुराव चव्हाण (वय ६३ रा. रायकर मळा, यवत दौंड) आणि मालक संतोष आत्माराम भंडारे (वय ४७, रा. वढू-बुद्रूक, शिरूर पुणे ) यांना अटक करण्यात आली आहे. अपघातात रामदास साहेबराव गायकवाड (वय ५२ रा. लाडबा वस्ती, केसनंद, हवेली ) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रामदास गायकवाड हे १८ मे रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास केसनंद गाव चौकातून दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी भरधाव वेगातील ट्रक चालक जर्नादन चव्हाण याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत रामदासच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे खाली पडून गंभीररित्या जखमी झाल्यामुळे रामदासचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ट्रक चालक जर्नादनकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले. मात्र, तरीही ट्रक मालक संतोष भंडारे यांनी हलगर्जीपणा बाळगून जर्नादनच्या ताब्यात ट्रक चालविण्यासाठी दिला. त्यामुळे ट्रकचालक जर्नादन आणि मालक संतोष भंडारे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वैजिनाथ केदार तपास करीत आहेत.
थेट वाहन जप्ती अन मालकांवर गुन्हे
शहरातसह उपनगरांत रात्र-दिवस अवजड वाहन चालक बेशिस्तपणे गाड्या दामटत असल्याचे दिसून आले आहे. त्यापार्श्वभूमीवर संबंधित ट्रक, टिप्पर, ट्रॅव्हल चालकांविरूद्ध कारवाई करीत त्यांची वाहने जप्त करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार वाहन जप्तीसह संबंधित मालकांविरूद्ध कारवाईला वाहतूक पोलिसांनी गती दिली आहे. बेशिस्तपणा खपवून घेउ नका, थेट कारवाई करा. असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच दिले आहेत.