कोथरूड अग्निशमन केंद्रातील सुट्टीवर असलेल्या जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्वत्र कौतुक
Pune : खिडकीत अडकलेल्या चिमुकलीचा अग्निशमन दलाच्या जवानाने वाचवला जीव – कात्रज भागातील गुजर निंबाळकरवाडी, खोपडे नगरमधील सोनवणे बिल्डिंगमध्ये आज सकाळी ९ वाजून ६ मिनिटांनी एक धक्कादायक घटना घडली. सोनवणे बिल्डिंगमधील उमेश सुतार यांनी एका मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकला आणि तात्काळ आरडाओरड सुरू केली. त्यांच्या आवाजामुळे शेजारी राहणारे योगेश अर्जुन चव्हाण, (तांडेल, अग्निशमन दल, पुणे) हे तात्काळ लगेचच आपल्या घराच्या गॅलरीत आले.
सराइताकडून तीन पिस्तुलांसह काडतुसे जप्त – बाह्यवळण मार्गावर गुन्हे शाखेची कारवाई – सविस्तर बातमी
गॅलरी मधून त्यांना भाविका चांदणे (वय ४ वर्षे) ही मुलगी तिसऱ्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पडण्याच्या अवस्थेत अडकली दिसली. ही धोकादायक परिस्थिती लक्षात येताच योगेश चव्हाण यांनी वेळ न घालवता सोनवणे बिल्डिंगच्या दिशेने धाव घेतली आणि थेट तिसऱ्या मजल्यावर पोहोचले.
परंतु घराबाहेरून कुलूप लावलेले होते, त्यामुळे मुलगी घरात एकटी होती. तिची आई दुसऱ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली होती आणि परत येत होती. याच दरम्यान योगेश चव्हाण यांनी तिथे धाव घेतली. आई पोचल्यानंतर लगेचच तिने दरवाजा उघडला आणि योगेश चव्हाण यांनी तत्काळ त्या चिमुकलीला खिडकीतून आत खेचत तिचा जीव वाचवला. योगेश चव्हाण यांच्या तत्परतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे एका चिमुकल्या मुलीचा जीव वाचला असून परिसरातील नागरिकांकडून त्यांच्या धाडसाचे आणि दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.






















