परिमंडळ चारच्या हद्दीत कारवाईचा बडगा
marathinews24.com
पुणे – गावठी हातभट्टी तयार करणार्यांविरूद्ध पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याच अनुषंगाने परिमंडळ चारच्या हद्दीत विविध पथकांनी १४ आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून २९४ लीटर हातभट्टी, ११ लीटर देशी दारू असा ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणार्यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. आगामी काळातही अशाच पद्धतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने घेतला गळफास – सविस्तर बातमी
पुणे पोलीस दलाच्या परिमंडळ चारच्या हद्दीतील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून कठोर कारवाईचे आदेश पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिले होते. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध पथकांनी १९ जुलै पहाटेपासूनच कारवाईला धडाका सुरू केला. लपून-छपून हातभट्टी तयार करणार्या ठिकाणी छापा टाकला. हातभट्टी दारू तयार करणारे, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणार्या १४ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी ३१ पोलीस अधिकारी, ८० पोलीस अमलदारांची विशेष पथके बनवून मोहीम राबविण्यात आली होती.
तब्बल २९४ लीटर हातभट्टी दारूचा केला नाश
पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील डोंगराळ भागासह नदी परिसरात लपून-छपून हातभट्टी तयार करणार्या व्यावसायिकांविरूद्ध मोहिम हाती घेण्यात आली. देशी-विदेशी मद्याची अवैद्य विक्री व्यवसाय करणार्या १४ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून जप्त केलेल्या २९४ लीटर हातभट्टी दारूचा नाश करण्यात आला आहे. ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी प्रांजली सोनवणे, एसीपी विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, अमलारांनी केली आहे.
























