आंबेगाव पठारमधील घटना
marathinews24.com
पुणे – प्रेमसंबंधास विरोध केल्याने मामावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात घडली. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा सीताराम बोडके (वय १९, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी परिसरातील समस्या दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर नियमित आढावा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण धनकवडीतील आंबेगाव पठार भागात राहायला आहे. तरुणाच्या भाचीबरोबर आरोपी बोडके याचे प्रेमसंबंध होते. मुलगी अल्पवयीन असल्याने तिचा तक्रादार तरुण, तसेच मुलीच्या आईने बोडकेला समजावून सांगितले होते. मुलगी १५ वर्षांची आहे. तिच्याबरोबर प्रेमसंबंध ठेवू नको, असे त्याला सांगितले होते. दोन ते तीन वेळा बोडकेला समजावून सांगितले होते. मामा आणि मुलीची आई प्रेमसंबधांना विरोध करत असल्याने बोडके चिडला होता. तक्रारदार तरुण मंगळवारी (२२ जुलै) सकाळी दहाच्या सुमारास दुचाकीवरुन कामावर निघाला होता. त्या वेळी आरोपी बोडके आंबेगाव पठार परिसरात आला. त्याने तरुणाला अडवून आमच्या प्रेमप्रकरणात आडवा येऊ नको, अशी धमकी दिली. तरुणावर कोयता उगारला. त्याच्या डाव्या हाताच्या पंज्यावर कोयत्याने वार करुन बोडके पसार झाला.
चारित्र्याच्या संशयावरुन गभर्वती पत्नीला बेदम मारहाण
चारित्र्याच्या संशयावरुन गर्भवती पत्नीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना एरंडवणे भागात घडली. मारहाणीत पत्नीचा गर्भपात झाला असून, याप्रकरणी पतीविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रवी शाम वाघमारे (वय ३५, रा. एरंडवणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्याच्या पत्नीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी याची पत्नी सात महिन्यांची गर्भवती आहे. तो पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा छळ करत होता. २० जुलै रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास त्याने पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला शिवीगाळ केली. त्याने तिच्या पोटावर ठोसा मारला, तसेच तिचे केस धरून फरफटत नेले. रक्तस्त्राव सुरू झाल्याने पत्नीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाणीत गर्भपात झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक अनुसे तपास करत आहेत.























