सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारे पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी
marathinews24.com
पुणे – क्रांतीकारक मंगल पांडे यांच्या नेतृत्वाखालील सन १८५७ मध्ये उठावाने ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध पहिल्यांदा सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवली. त्यानंतर भारत वर्षाच्या स्वातंत्र्य समराची सुरवात झाली . ब्रिटिशांनी त्यांच्याविरुद्ध झालेला उठाव सैनिकांचे बंड म्हणून मोडीत काढून क्रांतिकारकांची मुस्कटदाबी केली. तो उठाव मोडून काढला . उठावाचे परिणाम हळू हळू देशात इतरत्र सर्वदूर दिसू लागले . १८५७ च्या उठावातून बाहेर पडलेले क्रांतीचे विचार , स्वातंत्र्याचे विचार सर्वदूर पसरत होते. भारत मातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगणार्या अनेक लढवय्या मात्तबरांना या उठावाने प्रेरणा दिली.

जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती विराजमान – सविस्तर बातमी
साम्रज्याचा सूर्य कधीच मावळणार नाही अशा अविर्भावात असणार्या ब्रिटिश साम्राज्याविरोधात देशाच्या अनेक भागात क्रांतीच्या मशाली हातात घेऊन नरवीर स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती देण्यासाठी एकवटत होते . १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांनी कमालीचे दडपशाहीचे धोरण अवलंबले होते. दडपशाहीमुळे स्वातंत्र्याचे विचार सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे येत होते . काळाबरोबर स्वातंत्र्य क्रांतीचे विचार अधिकाधिक घट्ट होत होते. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगून आणि मनात क्रांतीची ज्योत सातत्याने ज्वलंत ठेऊन इंग्रजांविरोधात दोन हात करण्यासाठी सुसज्ज असे एक अग्रगण्य व्यक्तिमत्व कार्यरत होते ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध अग्रगण्य व्यक्तिमत्व. श्रीमंत भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हे त्यांच पूर्ण नाव. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे राजवैद्य होते . राहत्या घरी त्यांचा धर्मार्थ दवाखाना होता . देशभरातून त्यांचेकडे उपचारासाठी पीडित रुग्ण येत होते.

भाऊसाहेब स्वतः अध्यात्मवादी विचारांचे होते . त्यांचा धार्मिक विषयांचादेखील गाढा अभ्यास होता . त्यांचा राहता वाडा म्हणजे शनिवार वाड्याचा पिछाडीचा भाग . त्याला शालूकरांचा बोळ म्हणत . हा परिसर म्हणजे तत्कालीन शालूंची मोठी बाजारपेठ म्हंटल तरी कोणाची हरकत नसावी. परिसरामध्ये शालू विणण्याचे आणि शालू रंगविण्याचे काम चालायचे. श्रीमंत भाऊसाहेबांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय असल्यामुळे व्यवसायावरून त्यांना रंगारी हे आडनाव रूढ झाले . शालू रंगवता रंगवता भाऊसाहेबांनी भारतमातेच्या स्वातंत्र्याचं स्वप्न सुद्धा रंगवल होते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्यासारखा एकाचवेळी अध्यात्म, आयुर्वेद आणि क्रांतीकारी इत्यादी बहुविध विचारांचा अवलिया व्यक्तिमत्व असणारा माणूस या अंजन कांचन करवंदीच्या महाराष्ट्राच्या मातीत रुजत होता. आपल्या उरी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी धडपडत होता. ब्रिटिशांच्या तोडा – फोडा राज्य करा या दडपशाहीच्या धोरणात आपला समाज भरडला जातो आहे आणि स्वातंत्र्याच्या विचारापासून सर्वसामान्य माणूस दूर जात आहे हि बाब भाऊसाहेबांना अस्वस्थ करत होती. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर जाती , धर्मामध्ये विभागलेला समाज एकत्र आला पाहिजे अशी समाजाला दिशा देणारी विचार धारणा भाऊसाहेबांची होती.

सन १८९२ च्या सुरवातीला भाऊसाहेबांचे स्नेही सरदार कृष्णाजी काशिनाथ उर्फ नानासाहेब खासगीवाले ग्वाल्हेरला गेले होते . तेथे त्यांनी तेथील संस्थानिक दरबारामध्ये सर्व प्रजेला बरोबर घेऊन गणेशोत्सव साजरा होत असताना त्यांनी बघितला. पुण्यात परत आल्यावर त्यांनी भाऊसाहेबांशी विषयावर चर्चा केली. भाऊसाहेबांच्या मनात ब्रिटिश साम्राज्यविरोधात कारवायांसंदर्भात खल सुरु होता. अशा पूरक वातावरणात आपले स्नेही सरदार नानासाहेब खासगीवाले यांच्या सोबत झालेल्या चर्चेमधून भाऊसाहेबांना क्रांतीची वाट आणखी सुकर झाली. त्यांच्या मनामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मूर्त स्वरूप धारण करू लागली . भाऊसाहेबांचा विचार पक्का झाल्याने त्यांनी राहत्या वाड्यात आपल्या सहकार्यांची बैठक बोलावली.
बैठकीस महर्षी अण्णासाहेब पटवर्धन , बाळासाहेब नातू , गणपतराव घोटावडेकर , लखूशेठ दंताळे , बळवंत नारायण सातव , खंडोबा तरवडे , मामा हसबनीस , दगडूशेठ हलवाई आणि नानासाहेब पटवर्धन उपस्थित होते. त्यानंतर भाऊसाहेब रंगारी यांचे नेतृत्वाखाली सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सन १८९२ मध्ये भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुण्यात तीन गणपती बसविण्यात आले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, गणपतराव घोटावडेकर यांचा गणपती, आणि नानासाहेब खासगीवाले यांचा गणपती होय. १० दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतृदशी दिवशी गणपतींची मिरवणूक काढली . सार्वजनिक मिरवणुकीत काशिनाथ ठकूजी जाधव यांचा सवाद्य मेळाही होत. अशा प्रकारे उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण समाज एकत्र करून समाजाला विधायक दिशा देण्याचे राष्ट्रकार्य श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी यथोचित पार पाडले. ( महाराष्ट्र राज्यशासन – स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोष खंड तीनमध्ये भाउसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात १८९२ मध्ये केली आहे असे नमूद केले आहे. )
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या नव्या अध्यायामुळे वैभवशाली संस्कृतीच्या रांगड्या मातीत सार्वजनिक उत्सवाचं रोपटे रूजवण्यात आले. जाती पंथामध्ये अडकलेला समाज श्री गणेशाच्या उत्सवाच्या माध्यमातून एकत्र आला. ब्रिटिश साम्राज्यविरोधात एकत्रित समाजाची नवी ताकद जोमाने उभी राहिली. भक्तीचं शक्तीशी नातं सांगणार्या आपल्या पवित्र मातीत क्रांतीचा ध्वज सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आसमंतात दौलाने फडकू लागला. केवळ पुण्यातच नव्हे तर या उत्सवामुळे देशभरातील स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली. पुढच्या वर्षी सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप वाढत गेले. क्रांतीचे लोकशिक्षण उत्सवाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात भाऊसाहेब यशस्वी झाले होते. दरम्यान, सार्वजनिक उत्सवाचा नवा पायंडा लोकमान्य टिळकांना खूप पसंत पडला होता. उत्सवासंदर्भात त्यांनी केसरी वृत्तपत्रामध्ये मंगळवार दि . २६/९/१८९३ रोजी स्फुट लेखन करून ‘ यंदाच्या साली ज्या सद्गृहस्थाने हि खटपट केली त्याचे आपण आभार मानले पाहिजे ‘ असे श्रीमंत भाऊसाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले. उत्सवातून प्रेरित होऊन लोकमान्य टिळकांनी स्वतः सन १८९४ साली आपला गणपती सरदार विंचूरकर वाड्यात बसविला. समाजाच्या व देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला वेगळी दिशा देणार्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात अशा प्रकारे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी केली . यातूनच पुढे अनेक राजकीय आणि क्रांतिकारी चळवळी निर्माण होऊन त्याचा स्वातंत्र्य प्राप्तीसाठी उपयोग झाला.

क्रांतिकारकांचे आराध्य दैवत असणार्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीपुढे अनेक समाजधुरंधर पुढार्यांची, समाजसुधारकांची आणि क्रांतिकारकांची भाषणे, व्याख्याने, प्रवचने होत होती. प्रामुख्याने लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, पंडित मदन मोहन मालवीय, बिपीनचंद्र पाल, सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरक, सुभाषचंद्र बोस, हुतात्मा राजगुरू, प्रो . शि . म . परांजपे, कृ . प . खाडिलकर, श्रीधर जिन्सीवाले, श्रीधर विठ्ठल दाते, वासुदेवराव गांधी (वकील ) दादासाहेब खोपर्डे , बाळासाहेब पोतदार, नानासाहेब दंडवते (वकील ) मौलिचंद्र शर्मा, आचार्य ध्रुव, रंगाचार्य रेड्डी, रामानंद सरस्वती, डॉ . हेडगेवार, का .र .वैंशपायन, प्र . के. अत्रे, ग. म. नलावडे, प्रा . पुणतांबेकर, केशवदत्त महाराज, योगानंद दंडास्वामी, ह.भ. प सोनोपंत दांडेकर , सदाशिव शास्त्री काशीकर, श्री . बाबूशास्त्री गुळवणी , जयराम आचार्य, वि . प . भोपळे , विश्वासराव डावरे, य .द. खोले, जयवंतराव टिळक , नानासाहेब परुळेकर, आबासाहेब मुजुमदार , रावबहादूर बाबूराव ओंकार, वसंतराव पाटील , अप्पा कासार , रामभाऊ लोखंडे, शंकरराव मोटघरे, सादबा महादबा काटे , नारायणराव गुंजाळ इत्यादी मंडळी येऊन गेली आहेत.





















