कोरेगाव पार्क परिसरातील घटना
marathinews24.com
पुणे – सोन्याचा हंडा देण्याची बतावणी, महिलेला गंडा घालणार्या भोंदूला बेड्या – शहरातील उच्चभ्रु कोरेगाव पार्क परिसरात भोंदूबाबाने महिलेला अडीच लाखांचा गंडा घातला आहे. आर्थिंक अडचण दूर होउन सोन्याचा हंडा मिळवून देण्यासाठी त्याने महिलेकडून रक्कम उकळली. याप्रकरणी जादूटोणा करणार्या भोंदू बाबाला कोरेगाव पार्क पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महंमद खानसाहेब जान मदारी (रा. कोरेगावपार्क, पुणे) असे अटक केलेल्या भोंदूचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूडमध्ये घरकाम करणार्या महिलेने फिर्याद दिली आहे.
लाच प्रकरणात मंडल अधिकाऱ्यासह दोघांना ‘एसीबी’ने पकडले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूड परिसरात असून, तिची मैत्रिण एका वर्षापासून भोंदूबाबा मदारी याच्याकडे जात होती. तिच्याकडूनच तक्रारदार महिलेला बाबाची माहिती समजली होती. घरची आर्थिक चणचण दुर व्हावे असे तक्रारदार महिलेला वाटत होते. ही बाब तिने बाबा समोर बोलून दाखविल्यानंतर मदारीने तिला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा हंडा मिळवून देतो अशी बतावणी केली. त्यासाठी त्याने तिला पुजेचा घाट घालावी लागेल असे सांगून २ लाख ६० हजार रूपये घेतले. पंधरा दिवसांपूर्वी त्याने त्याच्या स्वतःच्या घरी पुजा मांडून तिला मातीचे मडके व त्यावर काळ्या रंगाचे कापड बांधून तिला ते मडके दिले.
मडकयावरील काळा कपडा १७ दिवसांनी रात्री ११ वाजून २१ मिनिटांनी उघडण्यास सांगितला. त्यानंतर महिलेनी या मदारीला १७ दिवसांनी फोन करून मडक्याचे काळे कापड काढले. मडक्यात हात घालून पाहिल्यानंतर महिलेला मडक्यात माती आढळली. त्यानंतर तिने त्याला फोन करून सांगितले असता त्याने तिला मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घरी बोलवले. यादरम्यान महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तक्रार दाखल होताच पोलिसांनी सापळा रचून भोंदू बाबा मदारीला ताब्यात घेतले. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२) तसेच अंधश्रध्दा व जादूटोणा विरोधी कायदा कलम ३ (२) नुसार गुन्हा दाखल केला.
भोंदूबाबाने फसवणूक केल्याची तक्रार आल्यानंतर आरोपीला अटक केली. त्याने महिलेला सोन्याचा हंडा मिळवून देतो असे आमिष दाखविले होते. त्यानंतर त्याने जादू टोणा करून महिलेला फसवले. त्याला न्यायालयाने त्याला १९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. – सुनील थोपटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोरेगावपार्क पोलिस ठाणे.