वानवडी पोलिसांकडून अटक
marathinews24.com
पुणे – पीएमपील बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या अट्टल सराईत गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून साडे तीन लाख रुपयांचे चार तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. चंद्रकांत राजू जाधव (वय ३१, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे असून तो मजुरीचे काम करतो. यापूर्वी त्याच्याविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे तब्बल २० गुन्हे दाखल आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकासकामांची पाहणी – सविस्तर बातमी
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने वानवडी पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एकजण जुन्या सोन्याचे दागिने विकण्यासाठी दुकान शोधत असल्याची माहिती तपास पथकातील अंमलदार अमोल पिलाणे आणि विष्णू सुतार यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे हे पथकासह रवाना झाले. शिंदे वस्तीजवळ सापळा रचून चंद्रकांत जाधव याला ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून सोन्याच्या तीन बांगड्या (४ तोळे) मिळून आल्या.
प्राथमिक चौकशीत चंद्रकांतने पीएमपील बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या हातातील बांगड्या गर्दीचा फायदा घेत चोरी केल्याची कबुली दिली. यापूर्वीही त्याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. कामगिरीबाबत वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनाजी टोणे, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, यतीन भोसले, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, अर्शद सय्यद, अभिजित चव्हाण, दीपक क्षीरसागर, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले यांनी केली.