पानशेत ते पुणे रोडवर मनेरवाडीत घडला अपघात – पुण्यातील पोर्शे प्रकरणाची पुनरावृत्ती
marathinews24.com
पुणे – भरधाव फॉर्च्युनर कार चालकाने राँग साईडने येऊन दुचाकीस्वार वकीलाला धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. अनिकेत अरुण भालेराव (वय ३५, रा. वरदाडे, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे काका शांताराम गोपाळ भालेराव (वय ५२) यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी (दि. १४) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पानशेत ते पुणे रोडवर मनेरवाडीत तारांगण हॉटेलसमोर घडली. दरम्यान, अपघातानंतर फॉर्च्युनरमधील चालक आणि तरुणी पसार झाले. याप्रकरणी हवेली पोलिसांनी फॉर्च्युनर (एमएच १४ ई ए ००५१) चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
डी. एस. के मध्ये गुंतवणुक केलेल्या गुंतवणूकदारांना पुणे पोलिसांनी केले आवाहन – सविस्तर बातमी

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत भालेराव हे शिवाजीनगर न्यायालयात वकिली करत होते. बुधवारी
संध्याकाळी चारच्या सुमारास ते भाजीपाला आणण्यासाठी खानापूरात गेले होते. साडेचारच्या सुमारास अनिकेत हे तारांगण हॉटेलसमोरून जात होते. त्यावेळी समोरून भरधाव राँग साईडने आलेल्या फॉर्च्युनर चालकाने त्यांना समोरून धडक दिली. धडकेत अनिकेत गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, दोन्ही पायांच्या गुडघ्याला तसेच डाव्या हाताला मार लागला होता. सुरूवातीला त्यांना खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी अनिकेतला मयत घोषित केले.
फॉर्च्युनर चालकाने मद्यपान केल्याची शक्यता
फॉर्च्युनर कार चालकाने मद्यपान केले असल्याची शक्यता वकिलाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. अपघातावेळी फॉर्च्युनर कारमध्ये एक तरुणी होती अशी माहिती त्यांनी दिली. अपघातानंतर कारचालक जखमीला मदत न करता पसार झाला. तो देखील एका खासगी रुग्णालयात गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आले. त्यानंतर सध्या कारचालक खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
आरोपीला डिस्चार्ज मिळताच अटक होणार- पोलिसांची माहिती
अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. फॉर्च्युनर कारमधील चालकावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मद्यपान केल्याचा संशय असल्याने आम्ही त्याचे ब्लड सँम्पल घेतले आहे. त्याचा रुग्णालयातील अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. आरोपी कार चालकाला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर आम्ही लगेचच त्याला अटक करणार आहोत. – सचिन वांगडे, पोलिस निरीक्षक, हवेली पोलिस ठाणे