दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे -तळजाई टेकडीवर फिरायला गेलेल्या युवकाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १७ वर्षीय युवकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण अरण्येश्वर भागात राहायला आहे. तो सोमवारी (दि.२० मे) सकाळी सातच्या सुमारास तळजाई टेकडीवर फिरायला गेला होता. तळजाई माता मंदिरापासून तो पायवाटेने निघाला होता. त्यावेळी दोन चोरट्यांनी त्याला अडवून धमकावले. शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील दीड लाखांची सोनसाखळी हिसकावून नेली. घाबरलेल्या युवकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तरुणाने दिलेल्या वर्णनानुसार पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.
टेकड्यावरील सुरक्षिततेचे झालं काय
बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या कोरियातील अभियंता तरुणाला चोरट्यांनी लुटल्याची शनिवारी (१७ मे) घटना घडली होती. चोरट्यांनी अभियंत्याला धमकावून त्याच्याकडील महागडा मोबाइल संच हिसकावून नेला होता. बाणेर टेकडी, हनुमान टेकडीवर फिरायला आलेल्या नागरिकांना लुटण्याच्या घटना गेल्या वर्षी घडल्या होत्या. त्यानंतर बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. टेकड्यांच्या परिसरात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर केला होता. निधीतून टेकड्यांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसाविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. टेकड्यांच्या परिसरात नियमित गस्त घालण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत. टेकड्यांच्या परिसरात पॅनिक बटण यंत्रणा बसविण्यात येणार आहे.