Breking News
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीलाबारामतीत पुन्हा विमान अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाही

अण्णा भाऊंचे साहित्य जागतिक मानवतावादाकडे वाटचाल करणारे : डॉ. बळीराम गायकवाड

अण्णा भाऊंचे साहित्य जागतिक मानवतावादाकडे वाटचाल करणारे : डॉ. बळीराम गायकवाड

मसापतर्फे अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येनिमित्त विशेष परिसंवादाचे आयोजन

marathinews24.com

पुणे – साम्यवादातील वर्गसंघर्ष आणि डॉ. आंबेडकरांनी दिलेला समानतेचा धडा, यांच्या आधाराने अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने जागतिक मानवतावादाकडे वाटचाल केलेली दिसते, असे निरीक्षण मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक तसेच फ्लोरिडा विद्यापीठाचे फुलब्राईट फेलो डॉ. बळीराम गायकवाड यांनी शुक्रवारी येथे नोंदवले. शाळेचे तोंडही पाहू न शकलेल्या अण्णा भाऊंनी त्यांचा ज्ञानाधिकार समाज विद्यापीठातूनच प्राप्त केला होता, असेही ते म्हणाले.

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी 

निमित्त होते, महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे अण्णा भाऊ साठे जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या विशेष संवादाचे. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा आजच्या काळातील संदर्भ, जागतिक साहित्य आणि दलित साहित्य यांचा सहसंबंध तसेच डॉ. गायकवाड यांचा साहित्यिक प्रवास श्रोत्यांसमोर उलगडला. मसापचे स्थानिक कार्यवाह व लेखक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी डॉ. गायकवाड यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला. मसापचे अध्यक्ष योगेश सोमण, स्थानिक कार्यवाह अंजली कुलकर्णी उपस्थित होते.

लौकिकार्थाने शिक्षित नसलेल्या अण्णा भाऊंनी १०२ साहित्यकृती निर्माण केल्या. त्यांना केवळ दलित साहित्यिक म्हणणे, हे अज्ञानाचे द्योतक आहे. त्यांच्या साहित्याचा विश्वव्यापक परीघ अभ्यासला, तर अण्णा भाऊंना विश्वसाहित्यिक अशीच संज्ञा योग्य ठरेल. दलित, शोषित, वंचित. स्त्रिया, स्थलांतरित अशा कित्येक घटकांविषयी त्यांनी लिहिले. त्याच उत्कटतेने त्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्रावरील प्रेम व्यक्त केले. त्यांच्या देशप्रेमाची प्रचिती पानापानांवर दिसते. आपण मात्र त्यांच्या मौलिक लेखनाकडे दुर्लक्ष करून, त्यांचा उपमर्द केला आहे, अशी खंत व्यक्त करत डॉ. गायकवाड म्हणाले, अण्णा भाऊंचे साहित्य आपल्याला संघर्ष करायला, अन्यायाविरोधात लढायला शिकवते. स्वाभिमानाची जाणीव देते. ते मनोरंजनापुरते नाही. मानवी दुःखाच्या निरासाची ओढ त्यात आहे. वंचित, शोषितांविषयीची संवेदनशीलता देते म्हणून ते कालातीत आहे आणि प्रत्येक पिढीच्या वाचकांसाठी आहे.

तंत्रज्ञानाच्या विकासाने आपण चंद्रावरही गेलो, पण शेजारी आपला समाजबांधव दुःखात आहे, याची जाणीव आपल्याला नाही, हा विरोधाभास त्यांनी तळमळीने मांडला आहे. तथाकथित प्रगती आणि अंधारातले उपेक्षित जगणे, यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी अण्णा भाऊंच्या साहित्याचे वाचन आजही संयुक्तिक आहे. ते फक्त लेखक कधीच नव्हते. ते रस्त्यावरचे तळमळीचे कार्यकर्ते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रमुख होते. त्यांनी लिहिलेले दिल्ली, बंगालचे आणि बर्लिन, स्टॅलिनग्राडचे पोवाडे त्यांच्या विश्वव्यापी विचारदृष्टीचे दर्शन घडवतात. त्यामुळे अण्णा भाऊंना केवळ दलितांचे लेखक म्हणून मर्यादित करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

अण्णा भाऊंची भाषाही सहज, सोपी होती. ते स्वतः सांगली – सातारा परिसरातले होते. त्यांच्या भाषेची रसाळता त्यांच्या साहित्यातून प्रकटलेली दिसते. ती ओढूनताणून सफाईदार, प्रमाणित करण्याचा कुठेही प्रयत्न त्यांनी केला नाही. त्यामुळे त्यांचे लेखन नेहेमीच थेट हृदयाला भिडणारे राहिले. जे सत्य आहे, तेच त्यांनी लिहिले, त्यांनी कल्पनेचे राज्य उभारले नाही. त्यांच्या फकीरा कादंबरीचा इंग्रजी अनुवाद मी कोरोनाकाळात पूर्ण केला. लवकरच त्यांच्या ६५ साहित्यकृतींचे अनुवाद वाचकांसमोर येतील. धर्म, वंश, वर्ण, भाषा यांच्यात भेद न करता, मानवतावादाचा स्वीकार करून जाणिवा समृद्ध करण्याची संवेदनशीलता त्यांचे साहित्य शिकवते, असेही डॉ. गायकवाड म्हणाले.

मसापचा पहिला पॉडकास्ट मसापचे अध्यक्ष योगेश सोमण म्हणाले, डॉ. गायकवाड यांच्याशी होणारा संवाद हा मसापचा अधिकृत असा पहिला पॉडकास्ट आहे. लेखकांशी मनमोकळा संवाद साधण्याचा हा उपक्रम, या मुलाखतीच्या निमित्ताने सुरू होत आहे, याचा आनंद आहे.

बालकलाकार अनय आपटे याने अण्णा भाऊ साठे यांच्या पोवाड्याचे सादरीकरण केले. उत्तरार्धात अग्रणी साठे व शार्दूल संत यांनी अण्णा भाऊंच्या ‘स्मशानातले सोने या कथेचे अभिवाचन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×