तरुणावर किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला; कासेवाडी पुण्यातील घटना
Marathinews24.com
पुणे – किरकोळ वादातून तरुणाच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील कासेवाडी भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुशील अजिनाथ थोरात (वय २६, रा. भगवा चौक, कासेवाडी, भवानी पेठ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भरत उर्फ हरिष मोरे (रा. कासेवाडी, भवानी पेठ) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. थोरातने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कुख्यात सनी जाधव टोळीवर मोका – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी (१४ एप्रिल) सायंकाळी कासेवाडीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रात्री नऊच्या सुमारास सुशील थोरात, त्याचे मित्र अनिकेत यादव, अभिजित जाधव हे भगवा चौकात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी थोरातच्या ओळखीचा आरोपी मोरे तेथे आला. त्याने थोरात याच्या खिशात हात घातला. थोरातने आराेपी मोरेला ढकलून दिले. या कारणावरुन मोरे चिडला. त्याने त्याच्याकडील तीक्ष्ण शस्त्राने थोरात याच्या गळ्यावर वार केले.
आरोपीने त्याला मारहाण केली. त्यावेळी मोरेने त्याच्याकडील शस्त्र हवेत उगारून परिसरात दहशत माजविली. पसार झालेल्या मोरेचा शोध घेण्यात येत असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.