बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी विकास आराखडा सादर करा – अजित पवार
marathinews24.com
पुणे – बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमच्या पुनर्विकासाबाबत सोमवारी (दि. २८) बैठक पार पडली. बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनचे राज्यातील नामवंत असे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय आहेत. त्यामुळे येथील ऑडिटोरियमचा पुनर्विकास करताना त्याचा हेरिटेज दर्जा कायम राखून तो महाविद्यालयाच्या लौकिकास साजेसा व्हावा. त्यासाठी तातडीनं एकात्मिक विकास आराखडा सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात अनेक विद्यार्थी वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत आहेत. इथल्या महात्मा गांधी सभागृहामध्ये (ऑडिटोरियम) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम तसंच राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्यात येतात. परंतु सद्यस्थितीत या कार्यक्रमांसाठी महात्मा गांधी सभागृहाची आसन क्षमता अपुरी पडत आहे. या सभागृहात ५०० विद्यार्थ्यांची आसनक्षमता आहे. तथापि या ठिकाणी सुमारे १५०० विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे या सभागृहाचा पुनर्विकास करून पंधराशे आसन क्षमतेचं सुसज्ज सभागृह निर्माण करण्यात यावं, असेही त्यांनी सूचित केले.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच १ हजार विद्यार्थी क्षमतेचं पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीचं वसतिगृह बांधण्यासही या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय होणार आहे.