१८ लाखांचा ऐवज लांबविला
marathinews24
पुणे – शहरात घरफोडीचे सत्र कायम असून, चोरट्यांनी वेगवेगळ्या भागात सदनिकेचे कुलूप तोडून १८ लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. धायरी, लोहगाव, हडपसर भागात घडल्या आहेत. सिंहगड रस्ता परिसरातील सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८ लाख ४६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाघोली, हडपसरमध्ये महिलांचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार धायरीतील राजब्लिस सोसायटीत राहायला आहेत. ते २६ मे रोजी बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील आठ लाख ४६ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम तपास करत आहेत.
हडपसरमधील मांजरी भागात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६ लाख २० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असून, याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मांजरीतील साईरामनगर भागात राहायला आहेत. २६ मे रोजी तक्रारदार आणि कुटुंबीय बाहेर गेले होते. चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करत आहेत.
मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी भागात घरातून चोरट्यांनी ५० हजारांचे तीन मोबाइल चोरून नेले. याबाबत एकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोहगाव भागातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख २० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
शाळांना सुटी असल्याने अनेकजण सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेरगावी जातात. चोरटे बंद सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरुन नेत असल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी शेजारी, तसेच सोसायटी रखवालदाराला माहिती द्यावी. सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे असल्यास चोरट्यांचा माग काढणे शक्य होते, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.