तहसीलदार गणेश शिंदे यांनी आढावा बैठकीत बोलतना सर्व यंत्रणांना निर्देश दिले
marathinews24.c0m
बारामती – आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा, वीज पुरवठा, शौचालय, हिरकणी कक्ष आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे. वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिले. बैठकीत त्यांनी सूचना दिल्या.
यावेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, सहायक गट विकास अधिकारी नंदन जरांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, विस्तार अधिकारी भीमराव भागवत यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्ग व विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल याची विशेष खबरदारी घ्यावी. स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. पालखी सोहळ्यादरम्यान आणि नंतरही स्वच्छता रहावी यासाठी आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी.
पालखी मार्गावरील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व वाहनांची व्यवस्था करावी. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतांना रुग्णवाहिकेत पुरेशा प्रमाणात औषधे आणि वैद्यकीय अधिकारी असतील याची दक्षता घ्यावी.
पालखी मार्गावर उत्तम वाहतूक व्यवस्थापन राहील याची काळजी घ्यावी. पालखी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. सर्व अधिकाऱ्यांनी पालखी मार्गाचा संयुक्त दौरा करून व्यवस्थेबाबत समन्वय ठेवावा, असे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले.
डॉ. बागल म्हणाले, वारी कालावधीत वारकऱ्यांची सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तालुका प्रशासनाने काम करावे. टँकरमधील पाण्याच्या शुद्धतेबाबत नियमित तपासणी करावी. पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरणही निटपणे होईल याकडे लक्ष द्यावे.पालखी मार्गावर निवारा कक्ष, हिरकणी कक्ष, सुरक्षित अखंड विद्युत पुरवठा, कचरा कुंडी आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे,असे डॉ. बागुल म्हणाले.
पाटील म्हणल्या, आपत्तीच्या काळात घडलेल्या घटनेबाबत प्रशासनास तात्काळ माहिती द्यावी. पोलीस प्रशासनाच्यावतीने आपत्तीच्या काळात सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही पाटील म्हणाल्या. बैठकीत पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या तयारीबाबत तालुक्यातील सर्व संबधित विभागाच्या अधिकारी माहिती दिली.