सहपोलीस आयुक्तांचे आदेश
marathinews24.com
पुणे – शहरात प्रखर प्रकाश झोत (बीम लाईट, लेझर बीम लाईट) सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. लोहगाव येथे हवाई दलाचा तळ आहे, तसेच नागरी विमानतळ आहे. विमानतळपासून १५ किलोमीटर अंतरापर्यंत प्रखर झोत सोडण्यास (वायुक्षेत्र) सोडण्यास बंदी घातली आहे. अशा प्रकारचे आदेश वेळोवेळी सहपोलीस आयुक्तांकडून देण्यात येतात. युद्धजन्य परिस्थिती विचारात घेऊन पुढील ६० दिवस शहर, परिसरात प्रखर झोतास बंदी घालण्याचे आदेश शुक्रवारी दिले.
पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती पाडा, पुणे पोलिसांचा इशारा – सविस्तर बातमी
वायुक्षेत्रात (एअर फिल्ड) प्रखर झोत सोडल्यास वैमानिकांचे डोळे दिपवून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर सहपोलीस आयुक्तांनी पुढील ६० दिवसांसाठी पुन्हा सुधारित आदेश दिले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहपोलीस आयुक्त शर्मा यांनी दिला आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी पाकिस्तानाने सीमावर्ती भागात क्षेपणास्त्रे डागल्यानंतर रात्रीपासून शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, विविध लष्करी संस्था, संशोधन संस्थांच्या परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे.
नागरिकांनो अफवांवर विश्वास ठेऊ नका
समाज माध्यमातून प्रसारित येणारे संदेशांची खातरजमा करणे गरजेचे आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका, तसेच अनुचित प्रकार घडल्यास त्वरीत पोलिसांना माहिती द्यावी. समाज माध्यमातील संदेशांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली आहे, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. सायबर सुरक्षा विचारात घेऊन समाज माध्यमातून प्रसारित करण्यात येणाऱ्या फाईलकडे दुर्लक्ष करावे. शक्यतो अशा फाइल उघडू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.