मेट्रोच्या कामामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक वळवली
marathinews.24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती भागात नदीपात्रात असलेला बाबा भिडे पूल २१ एप्रिलपासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. मेट्रोच्या कामामुळे पुलावरील होणारी दोन्ही बाजूची वाहतूक पुर्णतः बंद केली आहे. त्यामुळे परिसरातील काम संपेपर्यंत वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. वाहन चालकांनी पर्यांयी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
मोजमाजा करण्यासाठी चोरत होते दुचाकी पोलिसांकडून 10 दुचाकी जप्त – सविस्तर बातमी
डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडणारा पादचारी केबल ब्रिज तयार करण्याचे काम महामेट्रोच्यावतीने सुरु आहे. त्या कामासाठी भिडे पुलावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१ /सीआर- ३७ / टीआरए – २, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी वाहतुक बदलाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधित विभागातील वाहतूक २१ एप्रिलपासून बंद केली असून, पुलावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली आहे.
नदीपात्रात असा केला आहे वाहतूक बदल
भिडे पुलमार्ग डेक्कनकडे येणार्या वाहन चालकांनी टिळक चौक – खंडोजी बाबा चौक मार्गे इच्छित स्थळी जावे. तसेच नदीपात्र जयवंतराव टिळक पुल, गधर्व हॉटेल चौक, गंधर्व हॉटेल चौकातून डेक्कनमार्गे पुढे मार्गस्थ व्हावे. केळकर रोड,ओंकारेश्वर पुल, झाशीची राणी मार्गे पुढे जावे. तसेच भिडेपूल नदीपात्र रस्त्याने मेंहदळे गॅरेज चौक मार्गे डी.पी. रस्ता, कर्वेरोड-कोथरुकडे ये-जा करणार्या वाहन चालकांनी टिळक चौक, खंडोजीबाबा चौकातून मार्गस्थ व्हावे. टिळक चौकातून शास्त्री रोडने गांजवे चौक, एस एम जोशी पूलावरून पुढे जावे. तसेच पूना हॉस्पिटलनजीक असलेला ब्रीज फक्त दुचाकी वाहनांसाठी खुला आहे. डेक्कन पीएमपीएल बसस्थानक मार्गे केळकर रस्ता, नारायण पेठेकडे जाणार्या वाहन चालकांनी टिळक चौक, खंडोजीबाबा चौकातून मार्गस्थ व्हावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
महामेट्रोच्यावतीने भिडे पूल परिसरात पादचारी केबल ब्रिज तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याअनुषंगाने परिसरातील दोन्ही बाजूची वाहतूक २१ एप्रिलपासून बंद केली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून वाहतूक अमलदारांना सहकार्य करावे. -अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा