सॉफ्ट स्कीलचे धडे आले कामी, वादविवाद झाले कमी
marathinews24.com
पुणे – शहरातील प्रत्येक वाहतूक अमलदारांसह अधिकार्यांना सॉफ्ट स्कीलचे धडे देण्यात सत्र नुकतेच संपले आहे. आजपर्यत अशाप्रकारच्या प्रशिक्षणाची नांदी कधीही कर्मचार्यांमध्ये रुजली नव्हती. मात्र, सौजन्यता, विनयता, स्पष्टता, नम्रतेमुळे वाहतूक अमलदारांच्या वागणूकीत कमालीचा बदल घडून आल्याचे चित्र चौकाचौकात दिसून आले आहे. विशेषतः वाहतूक नियमभंग करणार्यांना अमलदारांकडून सर आणि मॅडम असे संबोधित करीत नियमांची माहिती दिली जात आहे. कर्मचार्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास दिसून येत असून, सॉफ्ट स्कील प्रशिक्षाची पहिली मोहित प्रशासनाने फत्ते केली आहे.
सहकारी बँकांनी ग्राहकाभिमुख व लोकाभिमुख व्हावे- उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी
प्रत्येक शहरातील पोलीस दलाची प्रतिमा वाहतूक अमलदारांवर आधारित असते. त्यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांसह वाहन चालकांना मिळणारी वागणूक पोलिसांसह एकंदरीत खात्याच्या भूमिकेबद्दल स्पष्टता निर्माण करते. दरम्यान, वर्षानुवर्षे पुण्यासारख्या मेट्रो शहरात आजवर कधीही वाहतूक पोलिसांना सॉफ्ट स्कीलचे धडे मिळाले नव्हते. त्यामुळे अनेकवेळा चौका-चौकात वाहन चालकांसोबत बहुतांश कर्मचारी – अधिकार्यासोबत हुज्जत, वादविवाद सुरू असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत होते. त्यातून होणारी भांडणे, शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरण थेट गुन्हा दाखल होण्याची प्रकियामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यातच एकीकडे वाहतूक नियमन अन दुसरीकडे दंडात्मक कारवाई करताना वाहतूक अमलदारांची तारेवरची कसरत नित्याचीच होती. त्यामुळे कामाची चिडचीड थेट कुटूंबियावर होत असल्याचेही प्रकार घडले होते. त्याचपार्श्वभूमीवर सर्वच पोलीस अमलदारांना सॉफ्ट स्कीलचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी प्रशिक्षणाचा आराखडा तयार केला. २३ फेबु्रवारी २०२५ दिवशी पुण्यात पहिल्यादांच वाहतूक कर्मचार्यांना सॉफ्ट स्कील प्रशिक्षणाचा श्रीगणेशा केला. जवळपास तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने तीन दिवशीय प्रशिक्षणात एकूण १८ सत्रामध्ये तब्बल १ हजार ४५ कर्मचार्यांनी सहभाग घेतला. त्यासोबतच ६३ अधिकार्यांनीही प्रशिक्षणाचे धडे गिरविले. राज्यभरातील नामांकित प्रशिक्षकांपैकी मनोज पाटील यांनी वाहतूक नियमन अन जनतेसोबतचे वर्तनाबाबत अमलदारांना प्रशिक्षण दिले. तर सुरेश गोखले, उर्मिला दीक्षित, मेधा कदम यांनी सॉफ्ट स्कीलबाबत मार्गदर्शन केले.
अनिल पंतोजी, प्रकाश जाधव, अशोक शिंदे, सेवानिवृत्त एसीपी महादेव गावडे यांनी मोटार वाहन कायदा, नियम व कायद्याची माहिती दिली. निवृत एसीपी विजयकुमार पळसुले, सुरेंद्र देशमुख यांनी व्हीआयपी दौरा, ग्रीन कॉरीडोरचे मार्गदर्शन केले. उपनिरीक्षक चंद्रकांत रघतवान यांनी मॅन्युअल सिग्नल, डॉ श्याम गायकवाड यांनी अपघातप्रसंगी प्रथमोपचार, अमित गोंजारी यांनी इ-चलानची माहिती दिली.
वाहतूक पोलिसांसह अधिकार्यांना हे दिले प्रशिक्षण
सलग १८ सत्रात वाहतूक विभागाीत सर्व कर्मचारी-अधिकार्यांना सॉफ्ट स्कीलचे धडे देण्यात आले आहेत. प्रशिक्षणात जनतेसोबत सौजन्याने कसे वागावे, वाहन कायदा, नियमांची माहितीबाबत लोकांना समजावून सांगणे. अपघातप्रसंगी घ्यावयाची काळजी, इ-चलान मशीनचा वापर करण्याची पद्धत, ग्रीन कॉरीडोरवेळी आपली जबाबदारी, व्हीआयपी, व्हीव्हीआयपी दौर्यात अमलदार ते अधिकारी यांची भूमिका, आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी, नीटनेटका पोशाख, प्रभावी सुसंवादावर भर देण्यात आला. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला, उपनिरीक्षक चंद्रकांत रघतवान, हवालदार देवीदास पाटील, शिपाई मल्हारी खडतरे, अश्विनी सरब यांच्या मेहनतीतून प्रशिक्षणाची सर्व सत्रे यशस्वीपणे पार पडली आहे.
सॉफ्ट स्कील प्रशिक्षणाच्या माध्यमातून वाहतूक अमलदारासह अधिकार्यांना अनेक नाविण्यपुर्ण गोष्टींची माहिती मिळाली आहे. त्यामुळे फिल्डवर असताना नागरिकांसोबतचा संवाद, वागणुकीच्या सौजण्यासह विविध बदल घडत आहेत. त्यामुळे वाहन चालकांसोबत वादविवाद, हुज्जतीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत प्रशिक्षणाचे चांगले फायदे होत आहेत. – अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा
पोलिसांची सुरूवातीची प्रतिमा वाहतूक अमलदारांसह त्यांच्या वागणूकीवर असते. त्याचपार्श्वभूमीवर त्यांना सॉफ्ट स्कीलचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. जवळपास तीन महिन्यात सर्व वाहतूक अमलदार-अधिकार्यांना धडे देण्यात आले. त्यामुळे आपल्याला चौका-चौकात तैनात असलेल्या अमलदारांच्या वागणूकीत चांगला बदल झाल्याचे चित्र आहे. अशाप्रकारचे ट्रेनींग सातत्याने देण्यात येणार असून, नागरिकांसोबतचे सौजन्य, विनम्रता महत्वाची आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर